पामबीच बनतोय मृत्यूचा सापळा

By admin | Published: July 25, 2015 10:40 PM2015-07-25T22:40:15+5:302015-07-25T22:40:15+5:30

महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बनविण्यात आलेला पामबीच रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. जानेवारीपासून अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

The palm is made of the trap of death | पामबीच बनतोय मृत्यूचा सापळा

पामबीच बनतोय मृत्यूचा सापळा

Next

- नामदेव मोरे,  नवी मुंबई
महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बनविण्यात आलेला पामबीच रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. जानेवारीपासून अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतितास ६० च्या वेगाने वाहने चालविणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात वाहनांचा वेग १०० ते १५० पर्यंत जात असल्यामुळेच अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सायन - पनवेल महामार्ग व ठाणे-बेलापूर रोडमुळे नवी मुंबईतून रोज लाखो वाहने जात असतात. या दोन्हीही प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सिडकोने पामबीच रस्ता बनविला आहे. पहिल्या टप्प्यात कोपरी पूल ते पालिका मुख्यालयापर्यंत किल्ले गावठाण चौकापर्यंत रस्ता बनविण्यात आला. यामुळे वाशीवरून बेलापूरला कमी वेळात जाणे सुलभ झाले. या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असल्यामुळे कधीच वाहतूक कोंडी होत नाही. यामुळे वाहनधारक मोठ्याप्रमाणात वेगमर्यादेचे उल्लंघन करू लागले आहेत. या रस्त्यावरून वाहने चालविण्यासाठी प्रतितास ६० ची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रोडची रचना केल्यानंतर चाचणी घेऊन ही मर्यादा निश्चित केली आहे. परंतु वाहनधारक किमान १०० च्या स्पीडने वाहने चालवत आहेत. अनेक वेळा ही मर्यादा १२० ते १५० पर्यंतही जात असल्याने अपघात होऊ लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी वारंवार अपघात होऊ लागल्यामुळे महापालिका प्रशासनाने मोराज सर्कल ते किल्ले गावठाणपर्यंत सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविली आहे.परंतु चालकांचे वेगावर नियंत्रण नसल्याने उपाययोजना कमी पडू लागल्या आहेत.

स्पोटर््स बाइकर्सची धूम
पामबीच रोडवर मागील काही महिन्यांपासून धूम स्टाईल मोटारसायकल चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महागड्या स्पोर्ट्स बाईक घेऊन तरुण पामबीचवर शर्यत लावत आहेत. विशेषत: शनिवार, रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी रायडर्सचे प्रमाण वाढते. या रायडर्सना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले असून त्यांच्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पामबीच रोडवरील महत्त्वाचे अपघात
२००५ : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने एपीएमसी पोलिसांना गस्त घालण्यासाठी दिलेल्या वाहनाने मोराज सर्कलच्या पुढे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना धडक दिली. तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता.
२००८ : इंडियन क्रिकेटचा माजी कर्णधार मोहम्मद अजरुद्दीनच्या स्कोडा कारला किल्ले गावठाण चौकाजवळ ट्रेलरने धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये अजरुद्दीनला गंभीर दुखापत झाली नाही.
डिसेंबर २०११ : पामबीचवर मध्यरात्री होंडा अ‍ॅकॉर्ड कारचा अपघात होऊन चौघांना मृत्यू. मद्यपान करून ताशी १५० च्या वेगाने कार चालविल्यामुळे अपघात झाला होता.
डिसेंबर २०१२ : पुणे जिल्ह्यातील तरुण मध्यरात्री पामबीच रोडवरून गावाकडे जात होते. होंडा अ‍ॅकॉर्ड कारने किल्ले गावठाण चौकात कारला धडक दिली. कारचा वरील भाग उडून गेला व आतमधील एका तरुणाचे डोके पूर्णपणे धडावेगळे झाले होते. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता.
जुलै २०१४ : सीवूडमधील अक्षर चौकाजवळ भाजी घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन व स्कूल बसचा अपघात झाला. यामध्ये ७ विद्यार्थी जखमी झाले होते.
२०१४ मध्ये पामबीच रस्त्यावर अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. वर्षभरात २८ अपघातांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. २८ जण गंभीर जखमी तर ४ जण किरकोळ जखमी झाले होते. परंतु यंदा जूनपर्यंत १२ अपघात झाले असून त्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ९ जण गंभीर तर १ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री झालेल्या दोन अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

धोकादायक मॉर्निंग वॉक
पामबीच रोडवर पादचाऱ्यांना मनाई आहे. परंतु सकाळी वाशी ते सेक्टर ५० दरम्यान शेकडो नागरिक पामबीच रोडवर मॉर्निंग वॉकसाठी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी मोराजजवळ झालेल्या अपघातामध्ये पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला होता. नागरिकांनी मॉर्निंग वॉकसाठी पामबीच रोडवर जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.


पामबीच रोडवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे अपघात होत आहेत. वाहतूक पोलीस स्पीड गनच्या सहाय्याने नियमित कारवाई करतात. महत्त्वाच्या सर्व चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात केले आहेत. सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु अतिवेग वाहनचालकांचा घात करीत आहे. चालकांनी स्वयंशिस्त पाळल्यास अपघात नियंत्रणात येतील.
- अरविंद साळवे,
उपआयुक्त, वाहतूक पोलीस

Web Title: The palm is made of the trap of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.