Join us

पामबीचवर धमाल, जल्लोष, मस्तीला उधाण

By admin | Published: May 25, 2015 10:44 PM

पनवेल, खारघर परिसरातील धमाल गल्लीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यावेळी नेरूळ पामबीचवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

नवी मुंबई : पनवेल, खारघर परिसरातील धमाल गल्लीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यावेळी नेरूळ पामबीचवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लोकमत वृत्त समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या या धमाल गल्लीमध्ये रस्त्यावरील ट्रॅफिक बंद करून बच्चेकंपनीबरोबरच मोठ्यांनीही धूम केली. या कार्यक्रमात स्थानिक रहिवाशांबरोबरच शहरातील विविध कलाकारही सहभागी झाले होते.झुम्बा, एरोबिक्स, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, योगा, संगीत, टॅट्यू मेकिंग, सायकलिंग, स्केटिंग, कराटे या सर्वच खेळांनी पामबीचच्या रस्त्यावर सर्वच वयोगटाच्या व्यक्तींनी मनसोक्त धमाल केली. लोकांच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर व्यक्तींनीही या कार्यक्रमाला भेट दिली. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, माजी नगरसेवक विजय माने, दिलीप घोडेकर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. शिरीष तळेकर (रेन्शो,गोन्जू-दियो केन्वाकाई जपान कराटे असोसिएशन), निशांत म्हात्रे ( टॅट्यू स्टुडिओ, उरण), प्रवीण कांबळे (क्रिएटिव्ह डिझाईन अ‍ॅकॅडमी,खारघर), नुडल्फ खान(स्पीड ट्रॅक स्केटिंग,सीवुड्स), नेहा मुंगा (ब्लीस फिटनेस अ‍ॅण्ड डान्स स्टुडिओ,खारघर), वझीरानी स्पोर्ट्स असोसिएशन, अश्विन जोशी या संस्थांचा तसेच कलाकारांचा विशेष सहभाग होता. नवी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.लोकमतच्या या धमाल गल्लीला संपूर्ण नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी लोकमतला पत्रे लिहून तसेच फोनवरून संपर्क साधून आपला अभिप्राय कळविला. पुढच्या वेळेस कार्यक्रमाचे ठिकाण विचारण्यासाठीही अनेकांनी लोकमतशी संपर्क साधला. या पुढील रविवारी पामबीच, वझीरानी स्पोटर््स क्लबजवळ नेरूळ सेक्टर १८ येथे धमाल गल्ली हा कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन धमाल करावी, असे आवाहन लोकमत वृत्तसमूहाच्या वतीने करण्यात आले आहे.हमरस्ता झाला हमारा रस्तापामबीचचा रस्ता म्हणजे नवी मुंबईचे मरीन ड्राईव्ह. अशा या वर्दळीच्या ठिकाणी काही तासांसाठी ट्रॅफिक बंद करून सर्वच वयोगटाच्या नागरिकांना मजा-मस्ती करण्याची संधी मिळाली. वाहनांसाठीचा हा रस्ता काही तासासाठी का असेना,पण तो आपला रस्ता झाला होता. याच संधीचा लाभ घेऊन नागरिकांनी रस्त्यावर आपल्यातील विविध कला सादर केला. यावेळी न नाचणाऱ्या व्यक्तींचे पायही संगीताच्या तालावर थिरकले.लोकमतच्या संकल्पनेचे स्वागतलोकमतच्या या धमाल गल्ली संकल्पनेचे स्वागत आहे. शहरातील धावपळीच्या आयुष्यात स्वत:साठी वेळ देण्यासाठी खूप कमी संधी मिळते. पण लोकमतने ही सुवर्णसंधी नवी मुंबईकरांना उपलब्ध करून दिली याचे खरोखरच कौतुक आहे. व्यायाम, मैदानी खेळ हे तणावमुक्त करणारे औषध आहे. संपूर्ण शहरात अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जावे अशीच अपेक्षा आहे.- सुधाकर सोनावणे, महापौरयोग, प्राणायाम हवेचयोगा, प्राणायाम यामुळे शारीरिक बळ तर मिळतेच पण त्याचबरोबर मानसिक ताणतणावही दूर करता येतो. व्यायामासारखे दुसरे कोणतेही औषध नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दिवसभरातला किमान अर्धा तास वेळ स्वत:साठी द्यायलाच हवा. चांगल्या व्यायामाबरोबरच चांगल्या खाण्याच्या सवयीही शरीराला लावून घेतल्या पाहिजे. तरुणांनी आधुनिक जीममध्ये न जाता विविध योगासने केली तर आणखी फायदा होईल. शारीरिक व्यायामाची सवय लावून दररोज व्यायाम हा केलाच पाहिजे.- कर्नल आर. पी. यादव, कामोठे योग परिवार.ताणतणावावर मात करणारा उपक्रमलोकमतने राबविलेला धमाल गल्ली हा उपक्रम स्तुत्य आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांना एक चांगले व्यासपीठ मिळाले. असे समाजोपयोगी कार्यक्रम नवी मुंबईत वर्षभर राबविले पाहिजे अशी अपेक्षा आहे. धमाल गल्लीमुळे एक चांगली सकाळ अनुभवायला मिळाली, पुन्हा एकदा लहान होता आले यासाठी लोकमत परिवाराचे मनापासून आभार.- प्रतिभा विश्वास डुबल, नेरूळ