मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा मुंबईबाहेर असताना, त्यांच्या बनावट सही, शिक्क्यांचा वापर करत पॅन आणि आधार कार्ड बनविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मुलुंड आणि ठाण्यातून हे रॅकेट सुरू असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
मुलुंडचे रहिवासी असलेले दिनेश सावंत (५३) हे कोटेचा यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पॅन, आधार, रेशन कार्ड बनवायचे असेल तर नियमाप्रमाणे संबंधित व्यक्तीला त्याचा राहण्याचा पुरावा द्यावा लागतो. ज्यांच्याकडे हा पुरावा नाही अशा नागरिकांबाबत सर्व पडताळणी केल्यानंतर, आमदारांकडून संबंधित व्यक्तीला परिशिष्ट ए नाहरकत प्रमाणपत्र देतात. त्यावर आमदारांचा सही व त्यांचा नावाचा शिक्का दिला जातो.
गेल्या महिन्यांत लल्लन सिंग यांनी एनएसडीएलचे अधिकृत सेंटर चालवायला घेतले. एजंटकडून पॅन कार्ड बनवण्यासीठीचे फॉर्म व कागदपत्रे येतात. त्यानुसार, ते पॅन कार्ड बनवून देतात. या कार्यालयात मुलुंड आणि ठाण्यातील एजंटकडून आलेल्या पॅनकार्डसाठीच्या अर्जामध्ये कोटेचा यांचे नाहरकत प्रमाणपत्र जोडले होते. मात्र, अर्जावर स्टॅम्पसारखे असले तरी सह्या वेगवगेळ्या असल्याने त्यांना संशय आला. सिंग यांनी, याबाबत सावंत यांच्याकडे चौकशी करताच स्टॅम्प आणि सहीही बनावट असल्याचे सांगितले. तसेच, कोटेचा याचे महाराष्ट्र विधानसभा सदस्य ओळखपत्राच्या झेरॉक्सचाही वापर केल्याचे दिसून आले. मुलुंड आणि मुंब्रा येथील एजंटकडून जवळपास ३५ ते ४० अर्ज आले होते. त्यात १३ अर्जांवर बनावट सही शिक्क्यांचा वापर केला होता. सावंत यांनी तत्काळ कोटेचा यांना सांगून पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. मुलुंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तर दिवसाला हजार फॉर्म देतो...
ठाण्यातील एजंट सिराज अन्सारी आणि मुलुंडमधील विभुती म्हस्के या दोघांकडून हे फॉर्म आले आहे. अन्सारी याने मुलुंड सेंटर सुरू झाल्यानंतर, तेथे दिवसाला हजार अर्ज आणून देतो असेही सांगितले होते? त्यामुळे व्याप्ती मोठी असू शकते.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करणे गरजेचे
याचा गैरफायदा होण्याची भीती असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघत, याचा सखोल तपास व्हायला हवा. गुरुवारी आणखी १४ बनावट आधार कार्डची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही काहींनी अशाच प्रकारे कागदपत्रे बनवून घेतल्याची शक्यता नाकारत येत नाही. - दिनेश सावंत, तक्रारदार