पॅन कार्ड क्लब घोटाळा; ईडीचे मुंबई, दिल्लीत छापे, गुंतवणूकदारांना साडेचार हजार कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 06:07 IST2025-03-04T06:06:40+5:302025-03-04T06:07:51+5:30
छाप्यांदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी व्यवहारांची अनेक कागदपत्रे, कंपनीच्या परदेशातील मालमत्तेचा तपशील आदी माहिती ताब्यात घेतली आहे.

पॅन कार्ड क्लब घोटाळा; ईडीचे मुंबई, दिल्लीत छापे, गुंतवणूकदारांना साडेचार हजार कोटींचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सुमारे ५० लाख गुंतवणूकदारांना साडेचार हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ईडीने ‘पॅन कार्ड क्लब’ कंपनीशी निगडित चार ठिकाणी छापेमारी केली. मुंबई आणि दिल्ली येथे ही छापेमारी करण्यात आली. छाप्यांदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी व्यवहारांची अनेक कागदपत्रे, कंपनीच्या परदेशातील मालमत्तेचा तपशील आदी माहिती ताब्यात घेतली आहे.
‘पॅन कार्ड क्लब’ कंपनीने तीन ते नऊ वर्षांच्या कालावधीत भरघोस परतावा देणाऱ्या अनेक गुंतवणूक योजना सादर केल्या होत्या. या योजनांवर भरीव परतावा देण्यासोबतच चांगल्या दर्जाच्या हॉटेलमध्ये सूट, अपघात विमा आदी सुविधाही दिल्या होत्या. या योजना सादर करताना कंपनीने सेबी आणि रिझर्व्ह बँक यांच्या नियमांचेही उल्लंघन केले होते.
परताव्याचे प्रलोभन
कंपनीने सुरुवातीला काही काळ गुंतवणूकदारांना परतावा दिला. त्यानंतर परतावा देणे थांबवल्याने हा गैरव्यवहार उघडकीस आला होता. सामान्य गुंतवणूकदारांनी कंपनीत केलेल्या गुंतवणुकीच्या पैशांतून कंपनीच्या संचालकांनी वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केली. प्रथम याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. मात्र, मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला आहे. त्यानुसार ईडीच्या पथकाने मुंबई आणि दिल्लीत छापेमारी केली आहे.