राणीच्या बागेत नवीन पाहुण्यांसाठी ‘घरकूल’, मुंबईकरांच्या भेटीला येणार पाणमांजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 02:25 AM2018-03-13T02:25:23+5:302018-03-13T02:25:23+5:30
राणीच्या बागेत गेल्या वर्षी मुक्कामास आलेल्या पेंग्विनने मुंबईकरांची मने जिंकल्यानंतर, आता आणखी काही पाहुणे मुंबईकरांच्या भेटीला येणार आहेत. या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
मुंबई : राणीच्या बागेत गेल्या वर्षी मुक्कामास आलेल्या पेंग्विनने मुंबईकरांची मने जिंकल्यानंतर, आता आणखी काही पाहुणे मुंबईकरांच्या भेटीला येणार आहेत. या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यात प्राण्यांसाठी कसरतीच्या आवारापासून कृत्रिम जलाशयापर्यंतचा समावेश आहे. यासाठी महापालिका तब्बल ६० कोटी रुपये खर्च करणार आहे.
सिंगापूरस्थित झेराँग पार्कच्या धर्तीवर मुंबईतील भायखळास्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण सुरू आहे. यासाठी १२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण कोरियातून हेम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन मुंबईत आणण्यात आले. यापैकी एका पेंग्विनच्या मृत्युमुळे प्राणिसंग्रहालयाची मान्यताच धोक्यात आली होती. मात्र, पेंग्विनला पाहण्यासाठी दररोज राणीबागेत उसळणा-या गर्दीने अखेर या वादावर पडदा पडला आहे.
त्यामुळे दुसºया टप्प्यात महापालिकेने आणखी काही देशी व परदेशी पाहुण्यांना आणण्याची तयारी केली आहे. या प्राण्यांसाठी १७ पिंजरे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर, या प्राण्यांना राणीच्या बागेत आणण्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी राणीच्या बागेत सीसीटीव्हीची नजरही असणार आहे. या कामाचे कंत्राट मे. स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंपनीला देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
>लँडस्केप प्राणिसंग्रहालयातील विद्यमान उद्यान कार्यालय पाडून, त्या ठिकाणी लँडस्केप उद्यानाचे काम करण्यात येणार आहे, यासाठी सात कोटी ८० लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे.
>असे आहेत नवीन पाहुणे
हरीण, कोल्हा, पाणमांजर, लांडगा, देशी अस्वल, मद्रास पाँड कासव, तरस, मांजर संकुल, बिबट्या, सर्प, वाघ, सिंह, सांबर, काकर, निलगायी, चौशिंगा, काळवीट, बार्किंग हरीण या प्राण्यांसाठी पिंजरे उभारण्यात येणार आहेत.
>विशेष सुविधा : प्राण्यांचे रात्रीचे निवासस्थान, कसरतीचे आवार, प्राणी पाहण्यासाठी गॅलेरी, प्रदर्शन गॅलेरीसाठी एक्रालिक ग्लासचे काम, प्राण्यांसाठी कृत्रिम जलाशय, पाण्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी जीवन समर्थन प्रणाली, पक्षी ठेवण्यासाठी तारांपासून तयार केलेल्या दोरखंडाची जाळी बसविणे, प्राण्यांच्या राखणदारीसाठी खोली बांधण्यात येणार आहे.
>सीसीटीव्हीचा ‘वॉच’ : भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेत परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेत वाढ करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र, आधीच तीन पाळ्यांत ७० कामगार राणीबागेत देखरेखीसाठी तैनात आहेत, परंतु हा वॉच चौफेर राहण्यासाठी महापालिकेने ५३ एकर असलेल्या या जागेत ३०० सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल पाच कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, पब्लिक अड्रेस सीस्टम बसविण्यात येणार आहे.