Pandharichi wari : ... अन् त्याने कोरोनातही वारी पूर्ण केली, SP सातुपतेंकडून व्हिडिओ शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 11:57 AM2021-07-19T11:57:15+5:302021-07-19T11:58:37+5:30
Pandharichi wari : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रीत चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत.
मुंबई - ''पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय" अशा जयघोषात तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चांदीच्या चलपादुका घेऊन आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास आजोळघरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. माऊली माऊली... करत ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत शिवशाही बसमधून मानाच्या 10 पालख्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत. एकीकडे आषाढीचा उत्साह तर दुसरीकडे यंदाही वारी चुकल्याची खंत अनेकांना वाटत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रीत चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत. पंढरपूरसह शेजारी गावांमध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनामुळे यंदाही पंढऱीची वारी होत नाही, वैष्णवांचा मेळा जमत नाही, भीमेच्या तिरावर लाखोंची गर्दी दिसत नाही, पावसात भिजणारा वारकरी दिसत नाही, पांडुरंगाची ओढ लागलेली ती भलीमोठी रांग दिसत नाही. पण, प्रत्येक वारकऱ्याच्या मनात विठु-माऊली दिसत आहे. पंढरपूर दिसत आहे, यंदाच घरातूनच ही पंढरीची वारी आणि विठु-माउलीचं दर्शन करायचं आहे, हेही ज्ञात आहे.
पंढरीची वारी जयाचिये कुळी ।
— Tejaswi Satpute (@TejaswiSatpute) July 18, 2021
त्याची पायधुळी लागो मज ।। १ ।।
तेणे त्रिभुवनीं होऊन सरता ।
नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ।।२ ।।
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा ।
क्षण जीवावेगळा न करी त्यांसी ।।३।।
नामा म्हणे माझा सोयरा - जिवलग
सदा पांडुरंग तया जवळी ।। ४ ।। pic.twitter.com/4i2LpebGSx
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वारीसंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. यंदाची वारी चुकत असली तरी घरीच राहून ती वारी आपण कशी पूर्ण करु शकतो, असेच त्यांनी या व्हिडिओतून सूचवले आहे. 2.20 मिनिटांच्या या व्हिडिओतून 'माऊली'च्या भक्तीभावाचा संदेश त्यांनी दिला आहे. त्यामध्ये, आजोबांची, वडिलांची वारी आजपर्यंत कधीच चुकली नाही, पण कोरोनामुळे यंदा वारी चुकतेय. मग, ती वारी आईला प्रदक्षिणा घालून पूर्ण करता येते, असे सांगणारा ज्ञाना दिसतोय. गणपतीने आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून पूर्ण केलेली पृथ्वीप्रदक्षिणा रेडिओवर ऐकल्यानंतर ज्ञाना आपली वारीही तशीच पूर्ण करतो, हेच या व्हिडिओतून दाखवले आहे. सध्या, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आळंदीतून मानाच्या पालख्या पंढरीकडे रवाना
फुलांनी सजविलेल्या दोन्ही विशेष बस पोलीस बंदोबस्तात आजोळ घराबाहेर आणून सज्ज करण्यात आल्या. त्यानंतर निमंत्रित वारकऱ्यांना सॅनिटाईज करून बसमध्ये प्रवेश दिला. सकाळी नऊच्या सुमारास माऊलींचा नैवैद्य दाखवून मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ - मृदुंगाच्या गजरात '"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री. ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय" अशा जयघोषात सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांनी पादुका हातात घेतल्या.
हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पादुका बसमध्ये फुलांनी सजविलेल्या पहिल्या खुर्चीवर विराजमान करण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आदींच्या हस्ते बसचे विधिवत पूजन करून हा आषाढी बसवारी सोहळा पोलीस बंदोबस्तात आजोळघरापासून नगरपालिका चौकातून इंद्रायणीच्या नवीन पूलमार्गे पंढरीला रवाना झाला.
वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी
यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हा सोहळा संपन्न होईल. मानाच्या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी होईल.