Join us

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी पंढरपूरची आषाढी पायी वारी झाली नाही. याचा फटका वारकऱ्यांसह एस.टी. महामंडळाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी पंढरपूरची आषाढी पायी वारी झाली नाही. याचा फटका वारकऱ्यांसह एस.टी. महामंडळाला बसला आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी पंढरपूरची वारी होत नाही. यावर्षी राज्यातून जाणाऱ्या ७ मानकरी पालख्यांसह इतर ४, अशा ११ पालख्यांना बसने परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई विभागातील ५ आगारांमधून ९७ बस सोडण्यात आल्या होत्या त्यांच्या ३०५ फेऱ्या झाल्या त्यामधून ४४ लाख २४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले; मात्र दोन वर्षांपासून हे उत्पन्न बुडत असल्याने महामंडळाला फटका बसला आहे.२०१९ मध्ये आषाढी यात्रेनिमित्त पाच आगारांमधील प्रवाशांनी बसद्वारे पंढरपूर गाठले; मात्र २०२० व २०२१ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी बंद असल्याने एस.टी. महामंडळाचे मोठे नुकसान झाले.

मुंबई विभागातील वारकऱ्यांची संख्या अधिक असून, नित्यनियमाने बस व रेल्वेने पंढरपूर गाठून विठुरायाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीनिमित्त विविध भागांतून जवळपास पालख्या वारीसाठी रवाना होतात. या पालख्यांमध्ये हजारो भाविकांचा समावेश असतो.

पंढरपूरसाठी साेडल्या गेलेल्या बस - ९७

पंढरपूरसाठी जाणाऱ्या बसच्या फेऱ्या - ३०५

रुपये उत्पन्न मिळायचे एसटी आगाराला - ४४२४०००

मुंबई विभागातील मुंबई, पनवेल, उरण आदी भागातून पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक एस.टी.ने जात असत; मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे बससेवा व वारी बंद असल्याने एस.टी. महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

- वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ

आजपर्यंत एकही वारी चुकविली नाही. ३० ते ४० जणांचा गट केल्यानंतर गावातून एस.टी. बसद्वारे पंढरपूर अनेकवेळा गाठले आहे; मात्र कोरोनामुळे वारीसाठी मुकलो आहे.

- अभिजित काळे, वारकरी

नित्यनियमाने विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारीत पंढरपूरला जायचो; मात्र गेल्या दोन वर्षांपासून निघणाऱ्या दिंड्या बंद झाल्या आणि दर्शनाला मुकलो.

- मनीष जाधव, वारकरी

वारीतील सातत्य ही आमच्या घराची परंपरा राहिली आहे; परंतु कोरोनामुळे खंड पडला आहे. वारी बंद झाली तरी गावात आषाढी एकादशीनिमित्त उत्साहाने कार्यक्रम घेतला जातो.

- नीलेश साठे,वारकरी