Join us  

पं. हरिप्रसाद चौरसियांना जीवनगौरव पुरस्कार; बासरी उत्सवात ९० कलाकारांनी छेडले श्रीराम भक्तीचे सूर

By संजय घावरे | Published: January 22, 2024 4:51 PM

या प्रसंगी ९० बासरीवादकांनी प्रभू श्रीरामाला समर्पित भक्तीगीतांचे स्वर छेडले.

मुंबई - अयोध्येत संपन्न झालेल्या श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्व संध्येला समारोप झालेल्या बासरी उत्सवामध्ये प्रख्यात बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांना जीवन गौरव पुरस्कार तसेच गुरुकूल सन्मान देऊन गौरविण्यात आले. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या बासरी उत्सवामध्ये चौरसिया यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी ९० बासरीवादकांनी प्रभू श्रीरामाला समर्पित भक्तीगीतांचे स्वर छेडले.

बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखालील गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा पंधराव्या बासरी उत्सवचे आयोजन करण्यात आले होते. २० आणि २१ जानेवारीला डॉ. काशिनाथ घाणेकर ऑडीटोरियम येथे संपन्न झालेल्या बासरी उत्सवाला ठाणे महानगरपालिकेचे उपयुक्त संदीप माळवी, तबला वादक योगेश सामसी, विवेक सोनार आणि अनुराधा हरिप्रसाद चौरसिया उपस्थित होते. अयोध्येमध्ये झालेल्या राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने बासरी उत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रशांत बनिया आणि रवी जोशी यांच्या बासरीवादनाची जुगलबंदी रंगली. त्यानंतर मंजुषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या वादनाने पहिल्या दिवसाची सांगता झाली. 

बासरी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी फ्लूट सिम्फनीमध्ये ८ ते ८० वर्षे वयोगटातील ९० बासरी वादकांनी बासरी वादन सादर केले. त्यानंतर पं. स्वपन चौधरी यांना पं. हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वपन चौधरी यांच्या एकल तबला वादनानंतर शशांक सुब्रमण्यम यांनी कर्नाटकी बासरीवादन सादर केले. भारतीय शास्त्रीय संगीताचा त्यातही बासरी व इतर संगीत प्रकारांचा प्रसार आणि प्रचार करणे व त्याला लोकप्रियता मिळवून देणे, या हेतूने दरवर्षी हे आयोजन केले जाते. त्या माध्यामतून भारतातील उच्च संगीत वारशाची जपणूक केली जाते. श्री विवेक सोनार यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या या महोत्सवात बासरीवादनातील विविध शास्त्रीय प्रकार सादर झाले. 

टॅग्स :मुंबई