मुंबई : मुंबई जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेच्या विद्यमान सर्व २१ संचालकांनी एकत्रितपणे एकाच पॅनलमधून निवडणुकीस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. मात्र, कोरोनाची स्थिती आणि संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन संचालक मंडळातील नेते मंडळींनी निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी नुकतीच कोहिनूर मंगल कार्यालय येथे एक बैठक घेतली. त्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, नितीन बनकर (भाजप), शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर (राष्ट्रवादी काँग्रेस), आमदार सुनील राऊत, नगरसेवक अभिषेक घोसाळकर, शिल्पा सरपोतदार (शिवसेना), संदीप घनदाट, आणि जिजाबा पवार (काँग्रेस) या सर्वपक्षीय नेत्यांनी एकूण २१ सदस्यांच्या संचालक मंडळासाठी एक पॅनल करण्याचा निर्णय घेण्यात आला.