मनोहर कुंभेजकर
मुंबई : भारतीयरेल्वेचे आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे नेटवर्क असून सुमारे 160 वर्षांपासून रेल्वे हा भारताच्या परिवहन क्षेत्राचा प्रमुख घटक आहे. तर सिग्नल यंत्रणा ही प्रमुख भूमिका बजावत असते. अनेक वेळा रेल्वे मोटरमनला चुकीचा सिग्नल मिळाल्यामुळे किंवा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे अपघात झाल्याच्या किंवा रेल्वे सेवा ठप्प झाल्याच्या घटना घडत असतात.
अशा या ऐतिहासिक उपक्रमाच्या भारतीय रेल्वेला लागणाऱ्या सिग्नल यंत्रणेच्या पॅनेलची निर्मिती ही उत्तर मुंबईच्या मागाठाणे, दहिसर (पूर्व) घरटन पाडा 2 येथील एका सामान्य वस्तीत होते. गेली 30 वर्षे निरज शर्मा हे कुशल इंजिनियर आणि त्यांचे 8 ते 9 सहकारी सदर पॅनेलची निर्मिती करत आहे.याठिकाणी रेल्वेच्या सिग्नल पॅनेलची निर्मिती होते हे समल्यावर उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी काल सकाळी या कुशल अभियंत्याला ते स्वतः भेटायला गेले. कर्जत रेल्वे स्टेशन साठी तयार करण्यात आलेल्या 7 फूट उंच व 17 फूट रुंद अश्या सिग्नल पॅनेलचे त्यांनी उदघाटन केले.आणि सदर सिग्नल पॅनलची निर्मिती करणाऱ्या निरज शर्मा यांचे त्यांनी कौतुक केले.
गेली 30 वर्षे भारतीय रेल्वेला लागणारी सिग्नल कम इंडिकेशनची आम्ही येथील घोट्या जागेत निर्मिती करत असून आत्ता पर्यंत सुमारे 800 पॅनेलची आम्ही निर्मिती केली आहे.मात्र 54 फूट उंच व 34 फूट रुंद मोठी डॉमिनो सिग्नल पॅनल्स हे अत्यंत काळजीपूर्वक आणि कुशलतेने तयार करावी लागतात. कारण सिग्नल पॅनल म्हणजे रेल्वेचा प्रमुख घटक असून या पॅनलवर रेल्वेची संपूर्ण सिग्नल यंत्रणा अवलंबून आहे अशी माहिती निरज शर्मा यांनी लोकमतला दिली. आज चक्क खासदार गोपाळ शेट्टी यांनी आमच्या छोट्या जागेत येऊन भेट द्यावी अशी विनंती त्यांच्या सहकारी निला सोनी याना केली होती.आणि त्यांनी स्वतः येथे भेट देऊन सिग्नल पॅनेलची पाहाणी करून पाठीवर कौतुकाची थाप मारल्याबद्धल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.