मुंबई विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात ‘पाणी’बाणी, टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 09:46 AM2023-02-01T09:46:44+5:302023-02-01T09:47:15+5:30
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील विद्यार्थिनींसाठी उभारलेल्या न्यू गर्ल्स हॉस्टेल या वसतिगृहाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जुलै २०२२ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील विद्यार्थिनींसाठी उभारलेल्या न्यू गर्ल्स हॉस्टेल या वसतिगृहाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जुलै २०२२ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. १४८ विद्यार्थिनींची प्रवेश क्षमता असलेल्या वसतिगृहात केवळ ७५ मुली आहेत. क्षमतेपेक्षा केवळ अर्ध्या विद्यार्थिनी असतानाही वसतिगृहात ‘पाणी’बाणी उद्भवली आहे. पाण्याच्या टंचाईमुळे वसतिगृहात टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
वसतिगृहासाठी दिवसाआड २० हजार लिटर पाण्याचा टँकर मागवावा लागत आहे. पालिकेकडून अद्याप नळाचे कनेक्शनच मिळाले नसल्याने टँकरच्या पाण्यावर लाखो रुपये खर्च आहेत, शिवाय विद्यार्थिनींचीही मोठी गैरसोय होत आहे. कलिनासारख्या मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मुंबई विद्यापीठात राज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. विद्यार्थिनींची शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यापीठात वसतिगृहाची सोय करण्यात आली, मात्र पाणी नसल्यामुळे विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश मिळणे कठीण बनले आहे.
पाणी नसल्याने प्रवेश बंद
पाण्याअभावी वसतिगृहात फक्त ७५ मुली राहत आहेत. उर्वरित जागांसाठी शेकडो अर्ज आलेले आहेत; परंतु पाणी नसल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आलेला नाही. सध्या दोन दिवसांआड पाच हजार लिटर पाणीपुरवठा टँकरने करण्यात येत असल्याची माहिती माजी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.
विद्यार्थिनींना पुरेसे पाणी द्या
विद्यापीठाला टँकरमुक्त करा अन्यथा वसतिगृहाला लवकरात लवकर पाण्याच्या पाइपलाइनची जोडणी करून घ्या, अशी मागणी माजी सिनेट सदस्य व युवासेनेचे पदाधिकारी प्रदीप सावंत, राजन कोळंबकर यांनी केली आहे.