Join us  

कुर्ला-चेंबूर भागात अनेक ठिकाणी 'पाणीबाणी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:05 AM

मुंबई : कुर्ला आणि चेंबूर या परिसरामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई नसली तरीदेखील नियमित वेळेवर पाणी न येणे व ...

मुंबई : कुर्ला आणि चेंबूर या परिसरामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई नसली तरीदेखील नियमित वेळेवर पाणी न येणे व त्या पाण्याला कमी प्रेशर या समस्या अजूनही नागरिकांना भेडसावत आहेत. कुर्ला आणि चेंबूर परिसरातील अनेक एसआरए इमारतींना अद्यापही महानगरपालिकेचे पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे कुर्ला-चेंबूर भागात अनेक ठिकाणी ‘पाणीबाणी’ असलयाचे चित्र दिसत आहे.

टँकरद्वारे इमारतीच्या तळघरात असलेल्या टाकीत किंवा टेरेसवरील टाकीत पाणी सोडून ते नागरिकांच्या घरोघरी पोहोचविण्यात येते. या परिसरामध्ये एका टँकरमागे दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. काही इमारतींमध्ये सकाळी एक तास व सायंकाळी एक तास या वेळेतच पाणी येते, त्यामुळे या वेळेत नागरिकांना घरात पुरेसा पाणी साठा करून ठेवावा लागतो.

चेंबूर व कुर्ला परिसरातील अनेक भागांमध्ये आजही अनधिकृतरीत्या पाण्याचे कनेक्शन जोडले गेले आहेत. अनेक डोंगराळ भागांमध्ये पालिकेचे पाणी पोहोचत नसल्याने नाइलाजाने नागरिकांना पाण्याचे कनेक्शन घ्यावे लागत आहे. असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. झोपडपट्टी भागात पालिकेच्या काही जलवाहिन्या जमिनीखालून गेल्या आहेत तर काही जलवाहिन्या नाल्यांमधून गेल्या आहेत. या जलवाहिन्यांना काही ठिकाणी गळती लागलेली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. त्याचप्रमाणे नाल्यांमध्ये गळती लागलेल्या जलवाहिन्यांमधून दूषित पाणी नागरिकांच्या घराघरापर्यंत पोहोचते. यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रतिक्रिया

आमच्या येथे अनेकदा दूषित पाणी येते, यामुळे आम्हाला पाणी नेहमी उकळून प्यावे लागते. काही जलवाहिन्या अत्यंत जुन्या झाल्याने त्यांना वारंवार गळती लागते. अशा वेळेस एक ते दोन दिवस पाणीपुरवठा खंडित होतो. प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मीनाक्षी साळवे, गृहिणी, चेंबूर