मुंबई : आठवडाभर पावसाने जोर धरल्याने मिठी नदीचे पात्र तुडुंब भरले आहे. अशात शनिवारी समुद्र भरतीच्या वेळी पावसाचा जोर अधिकच वाढल्याने मिठी नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. अजूनही हजारो घरे मिठी पात्रालगत असल्याने पुराच्या धोक्याची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर आहे.
उपनगरात वांद्रे-माहीम जंक्शनपासून सुरू होणारी मिठी नदी पुढे कालिना, कुर्ला दिशेने वाहते. या प्रवाहात मिठीचे पात्र अनेक ठिकाणी अरुंद आणि सखोल झाले आहे. या पात्रालगत अतिक्रमण करून नागरिकांनी लाखो झोपड्या उभारल्या आहेत. २६ जुलैच्या महापुरानंतर मिठी नदीचे पात्र रुंदीकरणात काही झोपड्या हटविण्यात आल्या. शिवाय नदीपात्रालगत संरक्षण भिंत उभारण्यात आली. मात्र, जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्याने मिठी नदीच्या पात्रात मोठी वाढ झाली आहे. ज्या भागात मिठीचे पात्र अरुंद आहे. तेथे पात्राचे पाणी नाल्याद्वारे लोकवस्तीत शिरते. तसेच पात्रालगत असलेल्या मिठीची पातळी वाढली की नागरिकांच्या पोटात गोळा येतो.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर खूपच वाढला होता. अशात शनिवारी मोठी भरती येत मिठीचे पात्र तुडुंब भरले होते. येथील रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. येथील काही भागात पाणी तुंबल्याने आपली घरे सोडून दुसऱ्या वस्तीत नागरिकांनी आश्रय घेतला होता.जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्याने मिठी नदीच्या पात्रात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः वांद्रे पूर्व येथील भारतनगर, वाल्मिकीनगर, ज्ञानेश्वरनगर, वाकोला, कालिना, गावदेवी, एअर इंडिया कॉलनी आणि झोपडपट्टी, कुर्ला सफेद पूल, बैल बाजार अशा सखोल भागात नदीपात्रालगत आजही लाखो लोक राहत आहेत.