मुंबई : रेल्वेमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. महिला प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी प्रशासनाने जालीम उपाय शोधला असून, त्यानुसार रेल्वे डब्यांमध्ये ‘पॅनिक बटण’ बसवण्यात येणार आहे. त्याद्वारे प्रवासी महिला ओढावलेल्या संकटांचा अलर्ट थेट प्रशासनाला देऊ शकणार आहेत.रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलांना रेल्वेतून प्रवास करताना अधिकाधिक सुरक्षित वाटावे म्हणून इमर्जन्सी अलार्म सिस्टीम म्हणजेच पॅनिक बटण आता रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यात बसवले जाणार आहे. रेल्वेतून प्रवास करताना महिलांना कोणतीही अडचण आली अथवा कोणताही अतिप्रसंग झाला तर या बटणाद्वारे संबंधित प्रवासी महिलेला प्रशासनाला घटनेचा अलर्ट देता येईल. महिलांच्या डब्यातील हे ‘पॅनिक बटण’ लाल रंगाचे आहे. रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात हे ‘पॅनिक बटण’ बसवले जाईल. महिलांच्या डब्यात प्रत्येक दोन सीट्सच्या मधोमध हे ‘पॅनिक बटण’ बसवण्यात येणार आहे. जर समजा एखादी महिला रेल्वे प्रवासी अडचणीत असल्यास; तिने हे बटण दाबले तर त्यानंतर रेल्वे डब्याच्या बाहेरील बाजूस आॅडिओ-व्हिडीओ सिग्नल देण्यात येईल. या सिग्नलमुळे बाहेरील लोकांना आणि फलाटावरील कर्मचारी वर्गाला याबाबत माहिती मिळेल. तसेच रेल्वेमधील कर्मचारी वर्गालाही याबाबतची तत्काळ माहिती मिळेल. परिणामी नव्या सुविधेमुळे महिलांच्या सुरक्षेत वाढ होण्यास मदतच होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने यावर केला आहे. (प्रतिनिधी)मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये या पॅनिक बटणची चाचणी घेण्यात आली आहे. ट्रायल म्हणून ‘पॅनिक बटण’ रेल्वेच्या चार युनिट्समध्ये लावण्यात येणार आहे. आणि त्यानंतर रेल्वेकडून सर्व ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात पॅनिक बटण बसवण्यात येणार आहे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महिला सुरक्षेसाठी रेल्वेत ‘पॅनिक बटण’
By admin | Published: May 29, 2016 2:02 AM