भूखंडाच्या वादातून दहशत

By admin | Published: January 6, 2017 05:02 AM2017-01-06T05:02:49+5:302017-01-06T05:02:49+5:30

मालाड (पूर्व) येथील नडियादवाला तबेल्याची जागा बळकावण्याच्या वादातून नाताळच्या दिवशी दोन गटांत भीषण दंगल झाली.

Panic Panic Controversy | भूखंडाच्या वादातून दहशत

भूखंडाच्या वादातून दहशत

Next

मुंबई : मालाड (पूर्व) येथील नडियादवाला तबेल्याची जागा बळकावण्याच्या वादातून नाताळच्या दिवशी दोन गटांत भीषण दंगल झाली. मात्र दिंडोशी पोलीस केवळ दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याऐवजी कोणतीच प्रतिबंधात्मक कारवाई करीत नसल्याने येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याची निवेदने स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांपासून पोलीस आयुक्तांना सादर केली आहेत.
नाताळच्या दिवशी दंगल झाली तरी त्याआधी चार दिवसांपासून येथे गुंडांच्या हालचाली सुरू होत्या. त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने दंगल झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे दंगलीत डबल बोअरच्या बंदुकीतून हवेत दोन - तीन गोळ्या झाडल्याचे दोन्ही तक्रारदारांनी आपापल्या जबाबात नोंदवले आहे. मात्र त्याबाबतही तपास होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. या तबेल्यांच्या जागेवर एसआरएची योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र तबेलेमालकांना ती मंजूर नसल्याने त्यांनी त्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून तो प्रलंबित आहे. २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत श्रीकांत मिश्रा, मगन तिवारी, रवी शर्मा, करण ईरायन, राजेश मिटना आणि १५ ते २0 जणांनी या जागेत संरक्षक भिंत बांधण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले. मात्र तबेले मालकांनी त्याला विरोध करीत त्याबाबत पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी २६ डिसेंबरपर्यंत भिंतीचे बांधकाम थांबवण्याची सूचना केली.
मात्र २५ डिसेंबरला पुन्हा येथे पत्र्याची भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले तेव्हा येथे दंगल झाली. या वेळी बंदुकीतून गोळीबार करण्यात आल्याची तक्रार संजय शुक्ला यांनी केली. त्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र नेहमीप्रमाणे पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र राजकीय वरदहस्तामुळे अनेक आरोपींना अद्याप अटक करण्यास टाळाटाळ होत आहे. डबल बोअर बंदुकीबाबतही तपास होत नसल्याचे मोहन कृष्णन यांनी सांगितले.
या जागेवर बिल्डरचा डोळा असल्याने गेल्या काही दिवसांपासून येथे गुंडांच्या मदतीने दहशत पसरवण्यात येत आहे. मात्र पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्यानेच २५ डिसेंबरला येथे दंगल झाली आणि तणावाचे वातावरण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Panic Panic Controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.