मुंबई- सर्वप्रथम २०१५ मध्ये पंकज उधास यांच्या संपर्कात आले. त्यानंतर आमची खूप वेळा भेट झाली. 'खजाना'च्या निमित्ताने उधास फॅमिलीशी जवळीक निर्माण झाली. पंकज उधास खूप महान गायक होते. मी त्यांना कधीच निगेटिव्ह बोलताना पाहिले नाही. त्यांच्याकडे खूप पेशन्स होते. सर्वांकडे ते मनवतावादी दृष्टिकोनातून पाहायचे असे गायिका रेखा भारद्वाज म्हणाल्या. पंकज उधास यांच्या आठवणीत आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनासभेत त्या बोलत होत्या.
आपल्या सदाबहार गायकीद्वारे देश-विदेशातील संगीतप्रेमींना गझलांची गोडी लावणारे गझल गायक पंकज उधास नुकतेच हे जग सोडून गेले, पण गझलांच्या माध्यमातून ते कायम स्मरणात राहणार आहेत. ट्रायडेंट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उधास यांच्या प्रार्थनासभेला संगीत तसेच अभिनय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली. यात त्यांचे बंधू मनहर आणि निर्मल उधास, अनुराधा पौडवाल, रेखा भारद्वाज, पं. सतीश व्यास, मधुश्री, जॅकी श्रॉफ, शीवमणी, नितीन मुकेश, तलत अझीझ, मिताली सिंग, ओजस अढीया, अभिनेत्री प्राची शाह, अभिजीत भट्टाचार्य, जिनो बँक्स, फरीदा उधास, रेवा उधास, नायाब उधास तसेच उधास यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. पंकज यांच्यासारखा माणूस आजवर पाहिला नसल्याचे सांगत रेखा भारद्वाज म्हणाल्या की, ते ज्याप्रकारे तरुण कलाकारांना प्रोत्साहन द्यायचे ते पाहण्याजोगे होते. गझलांद्वारे ते कायम समरणात आणि प्रेरणा देत राहतील. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आर्टिस्ट खूप असतात, पण त्यांच्यासारखी व्यक्ती पुन्हा होणार नाहीत असेही त्या म्हणाल्या.
उधास यांच्यावर उपचार केलेल्या डॉ. पी. ए. समधानी यांनी आपल्या आठवणीत पंकज यांच्या अखेरच्या क्षणांबाबत सांगितले. ते म्हणाले की, त्यांना कधीच विसरू शकणार नाही. ते सर्वांशी सलोख्याने वागायचे. डॉक्टर असो वा वॉर्डबॉय, सर्वांशी समान वागायचे. कुटुंबावर त्यांचे खूप प्रेम होते. आजाराच्या सुरुवातीपासून मी त्यांच्यावर उपचार करत होतो. जाण्यापूर्वी आदल्या रात्री ते थोडा वेळ एकांतात होते. त्यांनी माझे आभारही मानले. त्यांचे मन एखाद्या लहान मुलासारखे होते. ते खूप प्रेम मागे ठेवून गेल्याचेही ते म्हणाले.
'तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई...' हे गाणे पंकज यांना चपखल बसत असल्याचे सांगत त्यांचे सिडनीतील मित्र आकाश लोधिया म्हणाले की, ३७ वर्षांची आमची मैत्री होती. ८० च्या दशकाच्या अखेरच्या काळात त्यांच्याशी ओळख झाली. आम्ही भेटलो आणि त्यानंतर कधीच थांबलो नाही. खूप गोड, प्रेमळ, संवेदनशील व्यक्ती होते. इथे बसलेल्या प्रत्येकाने त्यांच्यासोबत ३०-३५ वर्षे तरी काम केले असेल. ते माझे भाऊ, मित्र, वेळप्रसंगी वडीलधारेही बनायचे. आयुष्यात त्यांनी सर्व नाती जपली. शोजच्या निमित्ताने त्यांच्यासोबत खूप प्रवास करण्याचा योग्य आला, पण त्यांना कधीच रागावताना पाहिले नाही. मी रागवायचो पण ते मला शांत करायचे. कामाबाबत अत्यंत प्रामाणिक होते. ते चिटिंग करून आम्हाला सोडून गेल्याचे सांगताना आकाश यांचा कंठ दाटून आला.