मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या जाहिरातीवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आक्षेप घेऊन यातील त्रुटी लक्षात आणून दिल्या होत्या. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एमपीएससी परीक्षेची जाहिरात शेअर करत, पंकजा यांनी सरकारला लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. पंकजा यांच्या फेसबुक पोस्टची दखल घेऊन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, नवीन जाहिरत प्रसिद्ध होण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा- 2020 जाहिरात क्रमांक 05/20 पोलीस उप निरीक्षक गट-ब (अराजपत्रित) PSI पदाच्या 650 पद भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. शासन निर्णयाप्रमाणे भ.ज.ड प्रवर्गासाठी सरळसेवा भरतीसाठी 2% जागा राखीव असतांना भ.ज.ड (NT-D) प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित दाखवली नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या संतापजनक प्रतिक्रिया आहेत. यात सरकार ने तात्काळ लक्ष घालावे व झालेला अन्याय दूर करणेसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, असे पंकजा यांनी म्हटले होते. त्यानंतर, धनंजय मुंडेंनीही आपल्या फेसबुक पोस्टवरुन अप्रत्यक्षपणे पंकजा यांच्याच प्रश्नाला उत्तर दिलंय.
''महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय भरती प्रक्रियेत एनटी-ड प्रवर्गावरील अन्याय दूर व्हावा यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत येत्या 2 दिवसात तातडीने बैठक घेत शासन निर्णयाप्रमाणे या प्रवर्गासाठी २% जागा आरक्षित करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती करणार'', असे धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. तसेच, एनटी-ड(भज-ड) संवर्गातील अनेक विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास व भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची तयारी करत आहेत. महाविकासआघाडी सरकार या संवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीला न्याय देईल हा माझा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.