मुंबई - भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा आज 42 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांन शुभेच्छा देण्यात येत आहेत. सोशल मीडियातूनही पंकजा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे पंकजा यांच्या लहान बहिण आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी भावनिक शब्दात पंकजा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या शुभेच्छांना पंकजा मुंडेंनी दिलेला रिप्लाय चर्चेचा विषय बनला आहे.
पंकजा मुंडेंना काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही, आमच्या भगिनी पंकजा मुंडेना वाढदिवसाच्या शुभेच्छा... असे ट्विट केलं आहे. तर, काँग्रेस नेते मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही पंकजांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, वडेट्टीवार यांना दिलेल्या शुभेच्छांचे आभार मानताना पंकजा यांनी केलेलं ट्विट चर्चेचा विषय बनला आहे. Thanks a lot आपले mission एकच आहे आरक्षण बचाओ... असे पंकजा यांनी म्हटलं आहे.
पंकजा यांच्या ट्विटचा नेमका अर्थ कसा काढता येईल, हे ज्याच्या त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. मात्र, आपलं मिशन एकच ओबीसी आरक्षण असे म्हणत पंकजा यांनी राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाची आठवण करुन दिलीय, असेच म्हणावे लागेल.
विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणासाठी लोणावळ्यात सर्वपक्षीय नेत्यांची परिषद भरवली होती. या परिषदेत पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावल्यात आले होते. त्यामुळे भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होता, अशी चर्चा रंगली होती. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल खंत व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला होता. मात्र, या ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव, राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आपणास वाढदिवसानिमित मनःपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात खासदार उदयनराजे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरही, पंकजा यांनी उत्तर दिले असून भावाच्या शुभेच्छा मिळाल्या... असे पंकजा यांनी म्हटलं आहे.
प्रीतम मुंडेंनीही आठवणी जागवत दिल्या शुभेच्छा
प्रीतम मुंडे यांनी ट्विटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, लहानपणीचा फोटो सगळ्यांचेच लक्ष वेधतो. या फोटोसह इतरही दोन फोटो प्रीतम यांनी शेअर केले आहेत. त्यासोबतच, भावनिक आठवण आणि संदेशही दिला आहे. '5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटतं, त्या आभाळाएवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा... असे प्रीतम यांनी म्हटलं आहे.