Pankaja Munde: "केतकीला एक वॉर्निग देऊन विषयाला पूर्णविराम द्यावा", पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 02:29 PM2022-05-19T14:29:09+5:302022-05-19T14:31:11+5:30
Pankaja Munde: शरद पवार यांच्या बाबतीत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी अभिनेत्री केतकी चितळेला पोलीस कोठडी संपल्यानंतर आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमांतून आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, गोरेगाव पोलिसांनीही केतकीच्या कोठडीची मागणी असून गोरेगाव पोलिसांना अद्याप केतकीचा ताबा अद्याप देण्यात आला नाही. मात्र, केतकीच्या वयाचा विचार करता, एक वॉर्निंग देऊन तिला सोडून द्यावं, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. यावेळी, केतकीची पोस्ट बिभत्सपणाची असल्याचंही त्यांनी म्हटलं.
शरद पवार यांच्या बाबतीत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी अभिनेत्री केतकी चितळेला पोलीस कोठडी संपल्यानंतर आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. केतकीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, केतकीच्या पोस्टवरुन राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा रंगली होती. केतकीच्या पोस्टचं समर्थन न करता, केतकीला ज्याप्रकारे ट्रोल करण्यात आले त्यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या ट्रोलर्संवर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता, पंकजा मुंडे यांनीही केतकीला वॉर्निंग देऊन ती गोष्ट संपवली पाहिजे, असे म्हटले आहे. अर्थात, केतकीची पोस्ट बिभत्सपणाची असल्याचेही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.
सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हा जरी व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असला तरीही सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. टीका जरी करायची असली तरीही बिभत्सपणे करु नये. त्या पोस्टमध्ये बिभत्सपणा मला आढळला त्याची मी निंदाच करते. मी लहानपणापासून राजकारण जवळून पाहिलं आहे. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. लोकं पेपरमध्ये लिहायची. तेव्हाही अनेकदा भाषा घसरायची. आम्ही अनेकदा बाबांना विचारायचो की अशा भाषेत लिहीलेलं तुम्ही सहन कसं करता? तेव्हा ते म्हणायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र, आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. पण, सध्या केतकीचं वय पाहता तिला एक वॉर्निंग देऊन द्या गोष्टीला पूर्णविराम दिला पाहिजे . पवार साहेब मोठे नेते आहेत, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.
गोरेगाव पोलीस ताबा घेऊ शकतात
पोलिसांना केतकीच्या जामिनाबाबतीत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सांगावे असं न्यायालयाने सांगितलं आहे. तोपर्यंत जामीन अर्जावर सुनावणी होणार नव्हती. केवळ सायबर कलम ६६ अ अन्वये युक्तिवाद झाला आहे. केतकीचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी बाजू मांडली. न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाकडून कोठडी देण्यात आली असून गोरेगाव पोलीसांना केतकीचा ताबा अद्याप देण्यात आलेला नाही.