पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का?; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 10:22 AM2022-08-31T10:22:06+5:302022-08-31T10:22:13+5:30
पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी वाट पाहत न बसता थेट वरिष्ठ नेतृत्त्वाकडे जाऊन दाद मागण्याचा सल्ला दिला आहे, एकनाथ खडसेंनी दिला आहे.
मुंबई - राज्यात भाजपा सरकार आल्यापासून पुन्हा एकदा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावर वर्णी लागावी अशी मागणी केली आहे. परंतु मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधान परिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सातत्याने पुढे येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्यांनी भाजपा वाढवला. परंतु ज्यारितीने तिकीट द्यायचं आणि त्यांनाच पाडायचं सूडाचं राजकारण भाजपानं केले. ते रोहिणी खडसेंच्या लक्षात आले. पंकजा मुंडे यांच्याही ते लक्षात आले पाहिजे. आपल्या पक्षाला वाढवण्याचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे पंख कसे छाटतात. तुमच्या पक्षात तुम्हाला भाजपा बाजूला कसं ठेवतंय हे तुम्ही ओळखणं गरजेचे आहे असं सांगत मिटकरींनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी वाट पाहत न बसता थेट वरिष्ठ नेतृत्त्वाकडे जाऊन दाद मागण्याचा सल्ला दिला आहे, एकनाथ खडसेंनी दिला आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे भाजपच्या विस्तारासाठी काम केलं आहे. मात्र एक गोष्ट खरी आहे पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतो आहे. तशी भावनाही सातत्याने जनतेत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत अशाही बातम्या येतात. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं की नाही? हा निर्णय सर्वस्वी पंकजा मुंडे यांचा आहे, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
भाजपा-मनसे युतीची चर्चा
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला जवळ केल्यानंतर राज ठाकरेंनी पक्षांचा अजेंडा आणि झेंडा बदलत हिंदुत्वाची भूमिका पुढे आणली. त्यानंतर राज ठाकरे हिंदुत्ववादी शिवसेनेची स्पेस भरून काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे दुरावलेल्या भाजपा नेत्यांनी राज ठाकरेंची जवळीक वाढवली. अलीकडेच राज्यात सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थ निवासस्थानी जात राज यांची भेट घेतली. त्याचसोबत इतर भाजपा नेतेही राज ठाकरेंची भेट घेत आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युती होणार का अशीच चर्चा राज्यातील जनतेमध्ये आहे.