Join us

Pankaja Munde Interview: मुख्यमंत्री व्हायची अजिबात इच्छा नाही; पंकजा मुंडेंनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 8:56 AM

"उद्धव ठाकरे आणि आमच्या कौटुंबिक संबंधांचे तसेच आहे. पण, राजकारणात आम्ही आमच्या भूमिकेत ठामपणे काम करतो आहोत. अलीकडेच ओबीसी आरक्षणावरून, मागे कोविडवरून टीका केली होती." - पंकजा मुंडे

मुंबई : मी राजकारणात असल्याने गाणे गाण्याची गरज नाही. तशीही तिथे मोठी गर्दी आहे... गाणे गाण्याच्या विचारानेच मला घाम फुटला आहे. भाषण दमदार असते, असे सांगताना ‘हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा... ’ या ओळी गुणगुणत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपला राजकीय इरादाच बोलून दाखवला.

राजकारणात नामांकन मागे घ्यावे लागणे, पराभव होणे अशा सर्व बाबी जीवनाचा भाग आहेत. यात इतके जिव्हारी लावून घेण्यासारखे नाही. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी ज्या ध्येयासाठी अपक्ष राहणे पसंत केले त्यासाठी संघर्षरत व्हायला हवे. त्यांना उमेदवारी मिळाली असती तर नक्कीच जास्त आनंद झाला असता. पण, आता त्यांनी आपल्या ध्येयासाठी झोकून द्यावे, अशी लहान बहीण म्हणून माझी भावना असल्याचे पंकजा मुंडे यांनी सध्याच्या घडामोडींवर बोलताना सांगितले. 

मुंबई लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमातील प्रगट मुलाखतीत त्या बोलत होत्या. मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली. माझे प्राथमिक शिक्षण परळीत झाले. जिल्हा परिषदेच्या शाळेत, मराठीत मी शिकले. स्थानिक वातावरणातच शिक्षण झाले पाहिजे, मुले आपल्या भागात वाढली पाहिजेत ही बाबांची भूमिका होती. शिक्षणाबाबत त्यांच्या काही धारणा होत्या. पुढे आम्ही मुंबईत आलो. बारावीपर्यंत जय हिंद कॉलेज आणि पुढे रुईयामध्ये शिक्षण झाले. त्यावेळी एखादा क्लास बंक करून, आईच्या परवानगीने एखादा इंग्रजी सिनेमा पाहणे व्हायचे. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने गृहमंत्र्यांच्या मुलीला फारसे कॉलेज लाइफ नसते, बाबा त्यावेळी गृहमंत्री होते. असेही त्या म्हणाल्या.

मस्ती-गडबड वगैरे केली म्हणून कधी घरी तक्रार गेली होती का?

बाबांपर्यंत तक्रार गेली नाही पाहिजे, ही जाणीव आम्हाला नेहमी होती. मुली साधारणपणे काळजी घेतच असतात. त्यात आम्ही राजकारण्यांच्या मुली. थोडी जास्तच काळजी घेतो, सजग असतो. राजकारण्यांच्या मुलांबाबत मात्र तसे फारसे म्हणता येत नाही. बाबा अनेकदा म्हणायचे, की मी नशीबवान आहे की मला सगळ्या मुलीच आहेत. त्यामुळे बाहेरून तक्रारी येत नाहीत.

गोपीनाथ मुंडे आता नाहीत, हे जेव्हा जाणवायला लागले तेव्हा काय काय मिस केलेत? 

बाबा राजकारणात, समाजकारणात व्यस्त असले तरी ते सतत संपर्कात असायचे. सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्याआधी त्यांचा फोन असायचा. इतक्या व्यस्त आयुष्यातही सर्वांचे वाढदिवस, आवडीनिवडी, सर्वांची शॉपिंग, सणवार या सगळ्या गोष्टी ते सांभाळायचे. पण, कदाचित मी त्यांचे फोन कॉल सर्वात जास्त मिस करते. एका फोनने त्यांचे कधी भागायचे नाही. बोलून फोन ठेवल्यावर दुसऱ्या सेकंदाला आणखी काही आठवले म्हणून त्यांचा फोन यायचाच. त्यांचे फोन मी जास्त मिस करते असे मला वाटते.

गोपीनाथरावांसोबतचा हळवा, कायम सोबत राहणारा प्रसंग कोणता? 

असे अनेक प्रसंग आहेत. पण, मला वाटते, त्यांनी नकळत कृतीतून केलेले संस्कार सोबत राहणारे आहेत. बाबांनी जेव्हा आमच्या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकले होते तेव्हा माझ्यासोबत सर्व प्रकारची मुले होती. त्यांच्याकडे पाहून आपल्याकडे काय नाही, यापेक्षा काय आहे हे बघून त्यात समाधान मानण्याचा संस्कारच त्यांनी बिंबवला. तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो.

गोपीनाथराव आता नाहीत, त्यांचे नसणे जाणवते का? 

विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि पुढे कोविडमुळे सगळ्यांना घरीच बसावे लागले. बाबांचा आवाज, त्यांची भाषणे ऐकण्याचे मी नेहमी टाळते. पण, कोविडमध्ये कोणीतरी त्यांचे एक भाषण पाठविले. तो आवाज कानावर पडला आणि मी खूप हलले. (हे सांगताना पंकजा मुंडे यांचा आवाजही भरून आला)

मुख्यमंत्री हाेण्याची इच्छा आहे? 

अजिबात नाही. सध्या जे चालू आहे ते पाहता मी आहे तिथेच बरी आहे.

अलीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकमेकांचे कौतुक केले. त्यानंतर शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. आमच्यातील मैत्री आणि कौटुंबिक नाते हा वेगळा भाग आहे. पारिवारिक संबंध तसेच असतात. उद्धव ठाकरे आणि आमच्या कौटुंबिक संबंधांचे तसेच आहे. पण, राजकारणात आम्ही आमच्या भूमिकेत ठामपणे काम करतो आहोत. अलीकडेच ओबीसी आरक्षणावरून, मागे कोविडवरून टीका केली होती. ती टीकासुद्धा त्यांच्या आताच्या भूमिकेवर असते. व्यक्ती म्हणून नसते.

पंकजा मुंडे यांनी सांगितलेला एक चांगला गुण आणि दिलेला एक सल्ला

देवेंद्र फडणवीस :  एक अत्यंत संयमी नेते आहेत. त्यांना काही वाटत असेल, काही गैरसमज होत असतील तर त्यांनी ते व्यक्त करायला हवेत. मनात ठेवू नयेत.

 राज ठाकरे :  राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आहे. लोकांना आकर्षित करण्याची, त्यांना एकत्र करण्याची त्यांची ताकद मोठी आहे. पण त्यांची भूमिका व्यापक असली पाहिजे.

आदित्य ठाकरे :  आदित्य क्युट आहे, गोड आहे. मी त्यांना लहान असल्यापासून पाहते आहे. त्यांचा चांगला गुण म्हणजे ते नकारात्मक बोलत नाहीत. लहान वयात मोठी जबाबदारी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे कामाची खूप संधी आहे. त्यांनी ते करावे.

धनंजय मुंडे :  धनंजय भावनिक आहेत हाच त्यांचा चांगला गुण आहे आणि तोच त्यांचा वाईटही गुण आहे. भावनेत वाहून जाणे त्यांनी टाळायला हवे.

सुप्रिया सुळे :  त्या वडिलांची खूप काळजी घेत असतात. मागे त्यांनी त्यांच्या वडिलांना पायात चपला घालण्यात मदत केली. त्या स्वत: चपला सरकवत होत्या. ते पाहून मी भावनिक झाले. वडिलांची काळजी घ्यायला मिळते हे किती मोठे भाग्य आहे. सध्या त्या राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यांनी हे असेच चालू ठेवावे.

टॅग्स :पंकजा मुंडेभाजपामहाराष्ट्र