महापुरुषांच्या अवमान प्रकरणावरून पंकजा मुंडेही आक्रमक, गोपिनाथ गडावर मौन पाळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:10 AM2022-12-12T10:10:57+5:302022-12-12T10:11:46+5:30
Pankaja Munde: छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे ह्या आज गोपिनाथ गडावर अर्धातास मौन पाळणार आहेत.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादांमुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. दरम्यान, महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे ह्या आज गोपिनाथ गडावर अर्धातास मौन पाळणार आहेत.
याबाबत माहिती देताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मी गोपिनाथगडावर जाणार आहे. तिथे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात आणि देशात घडलेल्या काही अप्रिय घटना यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असेल किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान असेल, अशा घटनांचा निषेध म्हणून त्यांना प्रतीकात्मक तीलांजली म्हणून मी सकाळी साडे अकरा ते बारा या वेळेत कडक मौन पाळणार आहे. या मौनव्रताचे फेसबूक लाईव्हच्या आणि झूमच्या माध्यमातून जे जे लोक जोडले जातील, त्यांनीही अत्यंत कडक पद्धतीने पालन करायचे आहे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंती निमित्ताने विनम्र आवाहन. #12_डिसेंबर#गोपीनाथगड#RememberingGopinathMundehttps://t.co/p6IOF3nyNU
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 11, 2022
दरम्यान, यावर्षी गोपिनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं. त्या म्हणाल्या की, गोपिनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हा सर्व वर्ग गोपिनाथगडावर येऊ शकत नाही. त्यामुळे यावेळी मी गोपिनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. गोपिनाथगड तुम्ही गावागावात घेऊन जा, वस्त्यावस्त्यांमध्ये घेऊन जा. ग्रामपंचायतींमध्ये घेऊन जा. तिथे हा कार्यक्रम साजरा करा, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.