मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसंदर्भातील संकोच दूर करू या- पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 06:52 PM2018-03-07T18:52:07+5:302018-03-07T18:52:07+5:30
मासिक पाळी, सॅनिटरी पॅड यासंदर्भात असलेला संकोच दूर होणे गरजेचे आहे. महिलांना मासिक पाळीच्या काळात ४ दिवसांसाठी वर्षानुवर्षे उंबरठ्याच्या आत डांबण्यात आले.
मुंबई - मासिक पाळी, सॅनिटरी पॅड यासंदर्भात असलेला संकोच दूर होणे गरजेचे आहे. महिलांना मासिक पाळीच्या काळात ४ दिवसांसाठी वर्षानुवर्षे उंबरठ्याच्या आत डांबण्यात आले. आता ग्रामविकास विभागाच्या अस्मितासारख्या योजनेतून या विषयावर किमान चर्चा होत आहे. मासिक पाळी, सॅनिटर पॅड यांसारख्या विषयावर महिलांना विनासंकोच बोलता आले पाहिजे. अस्मिता योजनेतून हे निश्चितच साध्य होईल, असा विश्वास विधानभवनातील पत्रकार कक्षात आज झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आला. ग्रामविकास आणि महिला-बालविकास मंत्री पंकजा मुंडे, महिला आमदार आणि पत्रकारांच्या उपस्थितीत आज ही चर्चा झाली.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ आणि राज्य शासनाच्या महिला - बालविकास विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'स्त्री अस्मितेची नवी साद' या विषयावर झालेल्या चर्चेत मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या वर्षा गायकवाड, चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दैनिक पुण्यनगरीच्या समूह संपादक राही भिडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वनिता पाटील, माटुंगा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तर ममता कुलकर्णी यांच्यासह महिला आमदार, महिला अधिकारी आणि उपस्थित पत्रकारांनी सहभाग घेतला.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अस्मिता बाजार योजना
मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, ग्रामीण मुलींना फक्त ५ रुपयांत ८ सॅनिटरी पॅड देणे हे अस्मिता योजनेचे उद्दिष्ट तर आहेच, पण त्याचबरोबर यासंदर्भातील लज्जा, संकोच दूर करण्यासाठी प्रबोधनावरही भर देण्यात येणार आहे. भविष्यात सॅनिटरी पॅडचा दर आणखी कमी करण्यात येईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही अस्मिता बाजार निर्माण करीत आहोत. कचऱ्याचे व्यवस्थापन करून खत निर्मितीसारख्या उद्योगात महिलांना प्रोत्साहन देण्यात येईल. अशिक्षित महिलांनीही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे असून त्यासाठी अस्मिता बाजार योजनेतून व्यापक उपाययोजना राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महिलेला तिच्यातील 'ती'पण कळणे तसेच आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे झोकून देणे म्हणजे अस्मिता आहे. आतापर्यंत महिलांसाठी डॉक्टर, नर्स, शिक्षक अशीच काही मर्यादीत कार्यक्षेत्रे होती. पण आता सर्वच क्षेत्रात महिला धडाडीने काम करीत आहेत. आजही समानतेचा थोडा अभाव असला तरी भविष्यात समानता निश्चितच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, आपल्याकडे एकीच्या भावनेची फार कमतरता आहे. सगळ्यांना स्वतंत्रपणे मोठे व्हायचे आहे, पण एकत्रपणे मोठे होण्याच्या भावनेचा मोठा अभाव दिसतो. सर्वांनी एकीची भावना ठेवून काम केले तरच समाज आणि राष्ट्र मोठे होऊ शकेल. महिलांच्या प्रश्नावर काम करतानाही ही भावना आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. फक्त ५ रुपयांत ८ सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी अस्मिता योजना फारच क्रांतिकारी असून महिला आणि मुलींसाठी ती वरदान ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सहाय्यक पोलीस आयुक्त वनिता पाटील म्हणाल्या की, मासिक पाळीसारख्या विषयावर ग्रामीण भागातील मुलींना आजही आईशीसुद्धा बोलताना संकोच वाटतो. बऱ्याच मुलींना मग एखाद्या मैत्रिणीशी बोलावे लागते. या विषयावर चर्चाच होत नसल्याने मुली आणि महिलांमध्ये त्याबाबत मोठे अज्ञान आहे. अस्मितासारख्या योजनेतून हे अज्ञान दूर होईल. त्याबरोबरच मुलींचा आत्मविश्वासही वाढेल, असे त्यांनी सांगितले.
माटुंगा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तर ममता कुलकर्णी म्हणाल्या की, मुलींना निर्भय आणि मुलांना संवेदनशिल बनविणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांवर संस्कार करताना ही दक्षता घ्यावी. महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. रेल्वे विभागात काम करताना ही भावना निश्चितच समाधान देते, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी आमदार स्नेहलता कोल्हे, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर, विद्या चव्हाण, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, संगीता ठोंबरे, मनीषा चौधरी, हुस्नबानो खलिफे, माधुरी मिसाळ, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, कोषाध्यक्ष महेश पवार, कार्यकारिणी सदस्य नेहा पुरव, मारुती कंदले, विजय गायकवाड, ब्रिजेश त्रिपाठी यांच्यासह पत्रकार, अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन आणि प्रास्ताविक मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारीणी सदस्य नेहा पुरव यांनी केले. सूत्रसंचालन माहिती, जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दैनिक सकाळच्या वरिष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी केले.