मुंबई - राज्यात मोठ्या राजकीय नाट्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र, तब्बल दीड महिन्याने मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मंत्रिपदाची संधी न दिल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. यापूर्वीही विधानपरषदेच्या निवडणुकांपूर्वी त्यांच्या समर्थकांनी आपली नाराजी उघडपणे दर्शवली होती. आता, स्वत: पंकजा मुंडेंनी पात्रेतेबद्दल विधान करत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
माझी पात्रता नसल्याने मंत्रीमंडळात स्थान मिळालं नसेल, असं सूचक वक्तव्य केलं. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंबद्दल विधान करताना, त्या सर्वच पदांसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं. पंकजा यांच्या या विधानावर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी आशावादी उत्तर दिलं. तर, विनोद तावडे यांनीही पंकजा यांच्या विधानावर बोलताना, त्यांच्याकडे अगोदरच मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं.
मी हरयाणाचा प्रभारी होतो, हरयाणा हे छोटंसं राज्य आहे. मात्र, पंकजा मुंडेंकडे मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे. त्या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे, पंकजा मुंडेंकडे माझ्यापेक्षाही मोठी जबाबदारी आहे. मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांवेळी त्या ठाण मांडून बसल्या होत्या. तेथे भाजपने विजय मिळवला, असे विनोद तावडे यांनी म्हटलं. तसेच, पक्षाने प्रत्येकासाठी काही ना काही विचार केलेला असतो, असेही त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांना मोठे पद
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही आमदारांची नाराजी असल्याविषयी महाजन म्हणाले की, अजून २३ मंत्री शपथ घेणे बाकी आहे. त्यात पंकजा मुंडे यांची नाराजी असण्याचा प्रश्नच येत नाही. कदाचित त्यांना मोठेपद मिळू शकते, असे महाजन म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराला दिरंगाई झाली हे मान्य आहे असे सांगत त्यांनी थोडीफार नाराजी असतेच मात्र ती दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे स्पष्ट केले