मुंबई - पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे आणि आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे, असे सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील जुगलबंदीवर प्रकाश टाकला आहे. तसेच मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्र्यांची झोप उडाल्याचेही उद्धव यांनी म्हटले.
मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांची झोप उडविल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मुख्यमंत्री पहाटे तीन वाजेपर्यंत जागून काम करतात, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात. कदाचित ते खरे असेलही, कारण मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांची झोप उडवली आहे, असे टीकास्त्र सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर सोडण्यात आले आहे. ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते.' असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवरायांची शपथ घेऊन म्हटले आहे. याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारकडून चालढकल केली जात आहे. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये?. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय? असा प्रश्न पडतो, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.