'पंकजा मुंडें भाजपात होत्या, आहेत अन् राहतील', चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 02:22 PM2019-12-02T14:22:15+5:302019-12-02T14:22:25+5:30

पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या होत्या, आजही आहेत अन् उद्याही असतील,

Pankaja Munde was in BJP, and will remain, Chandrakant Patil's explanation | 'पंकजा मुंडें भाजपात होत्या, आहेत अन् राहतील', चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

'पंकजा मुंडें भाजपात होत्या, आहेत अन् राहतील', चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

googlenewsNext

मुंबई - विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज्यातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. पंकजा मुंडे काय करतात, ते 12 डिसेंबरला कळलेच, असं सूचक विधान राऊत यांनी केलं होतं. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या होत्या, आजही आहेत अन् उद्याही असतील, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशाचे वृत्त चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावले. भाजपाच्या आजच्या स्थितीमध्ये गोपीनाथ मुंडेंचं मोठं योगदान आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुडेंनी उभारलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्या, नेत्या आहेत. त्यामुळे, भाजपा सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत त्या जाणार नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यामुळे मीडियातील या बातम्या केवळ अफवा असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय. 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडेंची जयंती असते, त्यामुळे 12 डिसेंबरला काही वेगळी घोषणा होईल, असे नाही. जयंती दिनाच्या कार्यक्रमाची ही माहिती असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील यांच्याअगोदरच भाजपा नेत्या खासदार पूनम महाजन यांनीही या वृत्ताचे खंडन केले आहे. पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत. पराभवामुळे त्या व्यथित असू शकतात. पराभवानंतरच्या अवस्थेतून मी पण गेलेय. त्यामुळे मी त्यांची स्थिती समजू शकते. 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुडेंच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमासाठी पंकजा यांचे प्रयत्न सुरू आहेत, त्या फेसबुक पोस्टचा राजकीय अर्थ काढू नका, असे पूनम यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंसह अनेक वरिष्ठ नेत्यांची तिकीटं कापण्यात आली होती. पंकजा मुंडेंना बीडच्या परळीमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर त्या सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर गेल्या आहेत. त्यांनी ट्विटरवरुन भाजपा नावाचा उल्लेखदेखील काढून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशीही चर्चा सुरु आहे. सध्या पंकजा मुंडे आणि बहुजन समाजातील काही लोकप्रतिनिधी यांच्यात एक वेगळा गट तयार करण्यावर एकमत झालं आहे असल्याची माहिती आहे. 

Web Title: Pankaja Munde was in BJP, and will remain, Chandrakant Patil's explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.