मुंबई - भाजपकडून राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पत्ता कट करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका कार्यकर्त्याने किटकनाशक द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. आता, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर संधी हुकल्यानंतर त्यांच्या समर्थकांची, बीडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता समोर आली. अगोदर खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलं आणि आता भाजप नेत्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेण्याचे सांगत ऐनवेळी त्यांचा पत्ता कट केला. त्यामुळे बीडमधील भाजप नेते आक्रमक होताना दिसत आहे. पंकजा मुंडेंसमोर पक्षातीलच काहींनी संकटे उभी केल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे. आता, शिवसेनेनं पंकजा यांच्या राजकीय भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
''आम्हाला पंकजा मुंडे यांची चिंता आहे. कारण त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे चांगले संबंध फार कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात जर काही वेगळं घडत असेल तर नक्कीच कौटुंबिक नात्याने आम्हाला चिंता वाटणारच. राजकारण हे राजकारण्याच्या दिशेने ते तुमचं तुम्ही बघा,'' अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंच्या राजकीय भूमिकेबाबत काळजी व्यक्त केली आहे.
पंकजा मुंडे असतील, प्रितम असेल, किंवा अन्य कोणी असतील तर त्यांचे आणि ठाकरे कुटुंबीयांचे, शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते आहे. म्हणूनच आम्हाला चिंता करण्याचा पूर्ण अधिकार आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची युती टिकवण्यात, वाढवण्यात नक्कीच गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्व फार महत्त्वाची भूमिका बजावत होते, अशी आठवणही राऊत यांनी सांगितली.
2 दिवस ईडी आमच्याकडे द्या
जर आमच्या हातात २ दिवस ईडी दिली, तर देवेंद्र फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील. महाराष्ट्रात सुद्धा निवडणूक आयोगाला हाताशी धरुन रात्रीच्या अंधारात नेते काय करत होते, हे सगळं आम्हाला माहित आहे, असे म्हणत राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यंत्रणा आमच्याकडेही आहेत, फक्त ई.डी नाही. जर ईडी ४८ तास आमच्याकडे दिली, तर भाजपसुद्धा शिवसेनेला मतदान करेल, असेही राऊत यांनी म्हटले.