मुंबई - निवडणूक आोयगाच्या घोषणेपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही भाजपाने संधी दिली आहे. त्यामध्ये, गेल्या काही वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आलं आहे. बीडमध्ये मागील दोन टर्मपासून खासदार असेल्या प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. पंकजा मुंडेंनी आज खासदार प्रीतम मुंडेंसह पत्रकार परिषद घेऊन या उमेदवारीचं स्वागत केलं. मात्र, मनात हलकसं दु:ख असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.
पंकजा मुंडेंचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभेच्या अनेक निवडणुकांवेळी पंकजा मुंडे यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले होते. मात्र, पक्षाकडून त्यांचे पुनर्वसन केले गेले नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंनी अनेकदा जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. मात्र आता थेट पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या उमेदवारीचे स्वागतही केले.
पक्षाने मला जबाबदारी दिली आहे, जबाबदारी स्वीकारुन तो सन्मान मानणे हे आमचे संस्कार आहेत, असे म्हणत पंकजा मुंडेंनी भाजपाने दिलेल्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे. महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडल्या, आघाड्या आणि युती झाल्या, त्यावरुन आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट दिलं जाईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे, या उमेदवारीचं मोठं आश्चर्य वाटलं नाही. त्यामुळे, आता नवीन अनुभवासाठी तयारी करायची आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून धनंजय मुंडे हेही आमच्यासोबत महायुतीमध्ये असल्याने आता प्रीतमताई यांच्यापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येईल, असेही पंकजा मुंडेंनी म्हटले.
प्रीतम मुंडे आणि माझ्यात चांगला समन्वय आहे. प्रीतम मुंडे जास्त दिवस घरी राहणार नाहीत. प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, असेही पंकजा यांनी यावेळी म्हटले. लोकसभा उमेदवाराला मी हा सन्मान मानते. पण, माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली नाही, याचं हलकं दु:ख माझ्या मनात आहे, जोपर्यंत ती तिच्या त्या जागेवर बसत नाही तोपर्यंत. कारण, केवळ माझी बहिण किंवा कुटुंबातील व्यक्ती म्हणून नाही. तर, गेल्या १० वर्षांपासून त्यांनी जी सेवा दिली, ज्या समर्पण भावनेनं काम केलं त्यासाठी, असे पंकजा यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीसांनी केलं अभिनंदन
सागर बंगल्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता, त्यांनी रात्रीच फोन करुन अभिनंदन केलं. माझी आणि त्यांची फोनवर अल्पशा चर्चा झाली आहे. मात्र, भेट झाल्यानंतर पुन्हा सविस्तर चर्चा होईल, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाल्या प्रीतम मुंडे
पंकजाताई या माझ्या नेत्या आहेत, त्यांचं बोट धरुनच मी राजकारणात आले आहे. त्यामुळे, आपल्या नेत्याला काही शिकवावं हे दिवस अद्याप आले नाहीत, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या उमेदवारीचं प्रीतम मुंडे यांनीही स्वागत केलं आहे. आता एकमेव लक्ष्य हे पंकजा मुंडेंसाठी लोकसभा निवडणुकीत उतरुन काम करायचं आहे. त्यामुळे, सध्या दुसरा कुठलाही प्लॅन डोक्यात नसून लोकसभा निवडणुकांसाठी पंकजाताईंच्या सोबत असणार आहे, असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले.
दरम्यान, प्रीतम मुंडे यांना डावलून बीड लोकसभेची उमेदवारी स्वीकारण्यास सुरुवातीच्या काळात पंकजा मुंडे यांनी नकार दिला होता. याबाबत जाहीरपणे भाष्य करत मी माझ्या बहिणीच्या जागी उभी राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, आता भाजप नेतृत्वाकडून आदेश आल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास तयारी दर्शवल्याचं दिसत आहे.