पंकजा मुंडेंच्या नाराजीमुळे तर्कवितर्कांना आले उधाण; शिवसेना प्रवेशाचा संजय राऊत यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 05:29 AM2019-12-03T05:29:50+5:302019-12-03T05:30:30+5:30

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या १२ डिसेंबर रोजी जयंतीदिनी पंकजा यांनी बीड जिल्ह्यातील गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Pankaja Munde's displeasure has led to arguments; Sanjay Raut claims Shiv Sena entry | पंकजा मुंडेंच्या नाराजीमुळे तर्कवितर्कांना आले उधाण; शिवसेना प्रवेशाचा संजय राऊत यांचा दावा

पंकजा मुंडेंच्या नाराजीमुळे तर्कवितर्कांना आले उधाण; शिवसेना प्रवेशाचा संजय राऊत यांचा दावा

Next

मुंबई : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी केलेली फेसबुक पोस्ट आणि सोमवारी टिष्ट्वटर अकाउंटवरून काढलेला भाजपचा उल्लेख, यामुळे त्या पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करणार या तर्कवितर्कांना उधाण आले होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अनेक भाजप नेते सेनेत प्रवेश करण्याचे वक्तव्य करून याला खतपाणी घातले. मात्र, पंकजा मुंडे कधीही भाजप सोडणार नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या १२ डिसेंबर रोजी जयंतीदिनी पंकजा यांनी बीड जिल्ह्यातील गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले आहे. याला हजर राहण्याचे आवाहन करताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ‘मावळे’ असे संबोधले. त्यामुळे पंकजा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला ऊत आला. पुढे काय करणार, याची दिशा त्या मेळाव्यात स्पष्ट करतील, अशी चर्चा आहे. परळीत पंकजा यांचा दारुण पराभव झाला. त्या पक्षात नाराज असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
आपल्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळावा, पक्षात महत्त्वाची जबाबदारी मिळावी किंवा विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठी दबावतंत्र म्हणून तर त्यांची ही खेळी नाही ना, अशीही चर्चा आहे. पंकजा यांच्या भगिनी प्रीतम या बीडच्या खासदार आहेत. पंकजा १२ डिसेंबरला शिवसेनेत जाणार की भाजपमध्येच राहून ओबीसींचे संघटन उभारण्याची भूमिका घेतील, या विषयी उत्सुकता आहे.
खा. संजय राऊत यांनी ‘पंकजांबाबत १२ डिसेंबरलाच कळेल; वाट बघा, अनेक बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत,’ असे विधान करून खळबळ उडवून दिली. माजी मंत्री व भाजपचे नेते विनोद तावडे यांनी मात्र राऊत यांचा दावा फेटाळला. ते म्हणाले की, पंकजा यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यांनी मेळाव्याचे निमंत्रण भाजपच्या नेत्यांनाही दिले असून, आम्ही तिथे आहोत. पंकजा यांच्या निष्ठेवर पक्षाला संपूर्ण विश्वास आहे. मुंडे-महाजन कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. याचा अर्थ पंकजा शिवसेनेत जाणार असा मात्र घेता कामा नये. भाजपचा कोणताही नेता शिवसेनेच्या संपर्कात नाही.
अजित पवार यांनी बंड करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये धनंजय मुंडे हेही होते. मात्र, त्यांनी लगेच शरद पवार यांच्याशी निष्ठा व्यक्त केली. शिवसेनेने पंकजा यांना पक्षात प्रवेश दिला, तर धनंजय मुंडे व पर्यायाने अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार नाराज होतील. आताच विश्वासदर्शक ठराव जिंकलेल्या ठाकरे सरकारला राष्ट्रवादीतील नेत्यांची नाराजी परवडणार नाही. शरद पवार याबाबत म्हणाले की, पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे, परंतु पक्षीय चौकट सोडून त्या जातील, असे मला वाटत नाही.

Web Title: Pankaja Munde's displeasure has led to arguments; Sanjay Raut claims Shiv Sena entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.