पंकजा मुंडेंची नाराजी उघड?, ना विजयाचं सेलिब्रेशन, ना विजयी उमेदवारांचं जाहीरपणे अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 01:43 PM2022-06-12T13:43:21+5:302022-06-12T16:17:27+5:30

पंकजा मुंडेंचं नाव राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांसाठी चर्चेत होतं. मात्र, प्रत्यक्षात त्यांना डावलण्यात आलं

Pankaja Munde's displeasure revealed? No celebration of victory BJP, no public congratulations to the winning candidates | पंकजा मुंडेंची नाराजी उघड?, ना विजयाचं सेलिब्रेशन, ना विजयी उमेदवारांचं जाहीरपणे अभिनंदन

पंकजा मुंडेंची नाराजी उघड?, ना विजयाचं सेलिब्रेशन, ना विजयी उमेदवारांचं जाहीरपणे अभिनंदन

googlenewsNext

मुंबई - भाजपकडून राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पत्ता कट करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका कार्यकर्त्याने किटकनाशक द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. दुसरीकडे पंकजा मुंडेंनी अद्यापही यावर मौन सोडलं नाही. विशेष म्हणजे राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावरही त्यांनी भाष्य केलं नाही.

पंकजा मुंडेंचं नाव राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांसाठी चर्चेत होतं. मात्र, प्रत्यक्षात त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे, मुंडे समर्थकांसह पंकजा मुंडे याही नाराज असल्याचं समजतं आहे. कारण, भाजपकडून विधानपरिषदेची यादी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. मात्र, यावर पंकजा यांनी काहीही विधान केलं नाही. तसेच, पंकजा मुंडेंनी अद्यापही याप्रकरणी मौन सोडलं नाही. त्यातच, राज्यसभा निवडणुकीत भाजपने लक्षवेधी विजय मिळवला. संख्याबळ कमी असतानाही भाजपचा तिसरा खासदार निवडून आला. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असलेल्या पंकजा यांनी या विजयाबद्दल ना उमेदवारांचे अभिनंदन केल्याचे दिसून आले, ना भाजपचे. 

पंकजा मुंडे या सोशल मीडियावर सक्रीय असतात. आपल्या फेसबुक-ट्विटर अकाऊंटवरुन त्या माहिती देत असतात. मात्र, भाजपच्या मोठ्या विजयानंतर त्यांनी कुठलिही पोस्ट न टाकता मौन धरल्याचे दिसून आले. विजयी उमेदवारांचे अभिनंदनही त्यांनी जाहीरपणे केले नाही. त्यामुळे, पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंकजा यांनी ट्विटरवर शेवटची पोस्ट 7 जून रोजी केली होती. तीही दूरदर्शनचे वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर, त्यांनी रविवारी दुपारपर्यंत कुठलिही पोस्ट केली नाही. 

आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता

''आम्हाला पंकजा मुंडे यांची चिंता आहे. कारण त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे चांगले संबंध फार कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात जर काही वेगळं घडत असेल तर नक्कीच कौटुंबिक नात्याने आम्हाला चिंता वाटणारच. राजकारण हे राजकारण्याच्या दिशेने ते तुमचं तुम्ही बघा,'' अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंच्या राजकीय भूमिकेबाबत काळजी व्यक्त केली आहे.

Web Title: Pankaja Munde's displeasure revealed? No celebration of victory BJP, no public congratulations to the winning candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.