मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क वाढविण्यात आल्याने मासिक उत्पन्नही वाढले आहे. पूर्वी दोन ते पाच रुपयांपर्यंत असलेले प्रवेश शुल्क थेट शंभर रुपये करण्यात आले आहे. या दरवाढीला विरोध झाला, मात्र राणीची बाग हे पर्यटक मुंबईकर आणि विशेषत: बच्चेकंपनीचे आवडते ठिकाण आहे. त्यात पेंग्विन पाहण्यासाठी खिशाला कात्री देऊन पर्यटक येत असल्याने मासिक उत्पन्न थेट पाच पटीने वाढत सध्या ४० लाखांचा गल्ला जमा होत आहे.गेल्या जुलै महिन्यात राणीच्या बागेत हम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन आणण्यात आले. यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. सध्या सात पेंग्विन राणीबागेत उभारलेल्या विशेष काचघरातील तलावात विहार करीत आपल्या लीलांनी पर्यटकांना मोहित करीत आहेत. याआधी पेंग्विन दर्शन केवळ दोन ते पाच रुपयांमध्ये होत असल्याने राणीबागेत झुंबड उडत होती. या गर्दीला शिस्त लावण्यासाठी तसेच पेंग्विनचा खर्चही अधिक असल्याने प्रवेश शुल्कात १ आॅगस्टपासून वाढ करण्यात आली.त्यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. मात्र मासिक उत्पन्न गेल्या दोन दशकांच्या तुलनेत पाचपट वाढले आहे. दररोज पाच हजारांवर पर्यटक राणीच्या बागेत येत आहेत. तर सुट्टीच्या दिवशी हा आकडा १५ ते २० हजारांवर जात असल्याचा राणीबागेतील कामगारांचा दावा आहे.मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात मागच्या वर्षी जुलैमध्ये दक्षिण कोरियाहून पेंग्विन आणले होते. हम्बोल्ट पेंग्विन कक्षात सध्या सात पेंग्विन आहेत. डोनाल्ड, डेझी, आॅलिव्ह, पॉपाया, मिस्टर मोल्ट, फ्लिपर, बबल अशी त्यांची नावे आहेत. पेंग्विन कक्षात सध्या तीन जोड्या आहेत. यातली ‘मिस्टर मोल्ट’ आणि ‘फ्लिपर’ ही पेंग्विनची जोडी लवकरच मुंबईकरांना गोड बातमी देणार आहे.
पेंग्विनमुळे राणीबागेकडे ‘लक्ष्मी’ची पावले, दररोज सरासरी पाच हजार पर्यटकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 2:32 AM