Join us

पन्नाशीपार पोलिसांना आता कार्यालयीन ड्युटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 6:14 AM

तसेच आरोग्याच्या कारणास्तव रजा हवी असल्यास तातडीने ती मंजूर करावी, असे आदेश त्यांनी राज्यातील सर्व पोलीस घटकप्रमुखांना दिले आहेत.

मुंबई : राज्य पोलीस दलातील पन्नाशीवरील अधिकारी-अंमलदार आता रस्त्यावर बंदोबस्त किंवा नाकाबंदी ड्युटी करणार नाहीत. त्यांना कार्यालयातील सोयीचे काम करायचे आहे. कोरोनाच्या विषाणूचा पोलिसांमध्ये होत असलेल्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी पोलीस महासंचालंकानी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच आरोग्याच्या कारणास्तव रजा हवी असल्यास तातडीने ती मंजूर करावी, असे आदेश त्यांनी राज्यातील सर्व पोलीस घटकप्रमुखांना दिले आहेत.राज्य पोलीस दलातील शंभरहून अधिक अधिकारी -अंमलदाराना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या दुप्पटीहून अधिक जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोनामुळे चार पोलिसांचा बळी गेला आहे. त्यामुळे पोलीस दलही हवालदिल झाले आहे.जीवावर उदार होऊन ड्युटी करणाऱ्या कनिष्ठ अधिकारी, अंमलदारावर कोरोनाच्या भीतीचे सावट आहे. तर काही वरिष्ठ अधिकारी जणू काही पोलिसांना कसलाच धोका नाही, या अविर्भावात मनमानीपणे पन्नाशी पार केलेल्या अधिकारी, अंमलदारांना हवी तशी ड्युटी लावत असल्याने पोलिसांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, ही बाब लक्षात घेऊन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी ५०-५५ वर्षांवरील अधिकाऱ्यांना सद्याच्या परिस्थितीत केवळ कार्यालयीन ड्युटी द्यावी, त्याचा नागरिकांशी कसल्याही प्रकारे संपर्क येऊ नये, याची खबरदारी घ्यावी, त्यांना नाकाबंदी किंवा रस्त्यावरील बंदोबस्त अजिबात लावू नये, अशी सक्त सूचना केल्या आहेत.तसेच सूचनांसोबतच या वयोगटातील जे अधिकारी, अंमलदार विविध व्याधीने त्रस्त आहेत, त्यांची विशेष काळजी घ्यावी, तब्येतीच्या कारणास्तव त्यांना रजा हवी असल्यास तातडीने द्यावी, अशी सूचना केली आहे.>पोलिसांच्या आरोग्याची काळजी घ्याकोरोनाच्या वाढत्या विषाणूमुळे पोलिसांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे ५० वर्षांवरील पोलिसांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, त्यांना कार्यालयातीलच कामे द्यावी, अशा सूचना केल्या आहेत.- सुबोध जायसवाल, पोलीस महासंचालक

टॅग्स :पोलिस