- प्रज्ञा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : झाडाच्या पाना-पानांमधून वेगवेगळ््या प्रकारांची गाणी वाजविणारा अवलिया हा अपवादच. ठाण्यात राहणारा असा एक हरहुन्नरी कलाकार गेल्या २५ वर्षांपासून असे अनोखे पर्णवादन करतोय. अर्थात अजून तरी हा कलाकार ठाणेकरांकडून दुर्लक्षितच राहिला आहे. अॅड. प्रकाश खरगे असे या कलाकाराचे नाव आहे. हिंदी-मराठी गाणी असोत किंवा एखादे भजन... खरगे अगदी सहजरित्या पानांमधून त्याचे सूर लीलया आपल्या कानी उतरवतात. आता तर राष्ट्रगीतदेखील पर्णवादनातून सादर करण्याची कला त्यांनी अवगत केली आहे. या पर्णवादनातून शास्त्रीय संगीत सादर करुन वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची त्यांची इच्छा आहे. अॅड. प्रकाश हे राबोडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत. लहानपणापासूनच त्यांना हा पानापानांमधून झिरपणारा सूर गवसला. १९९५-९६ साली बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना स्नेहसंमेलनाच्यावेळी त्यांनी सर्वांसमोर हे पर्णवादन केले. हे त्यांचे पहिलेच सादरीकरण. त्यांच्या अनोख्या सादरीकरणाला त्यांच्या प्राध्यापकांनी दाद देत त्यांना पारितोषिक दिले. यातून प्रोत्साहन घेऊन त्यांनी आपली कला विकसीत केली. त्यात वेगवेगळे संशोधन केले. आता ते इतके अप्रतिम वादन करतात, की एखादे वादनाचे नवे साहित्यच त्यांनी हातात घेतले आहे, की काय असे भासू लागते. कोणत्याही झाडांची पाने ओठांत घेत त्यात अलवार हवा फुंकत गेल्यावर जो ध्वनी निघतो, तेच माझे स्वर असतात असे ते सांगतात. प्रत्येक पानाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक पानातून वेगवेगळे ध्वनी निघतात असा अनुभवही त्यांनी सांगितला. आजपर्यंत खरगे यांनी जवळपास दोन हजार गाणी पर्णवादनातून वाजविली आहेत. विशेष म्हणजे यात कन्नड गाण्यांचाही समावेश आहे. छोट्या-मोठ्या स्थानिक कार्यक्रमात अॅड. प्रकाश पर्णवादन करीत असले तरी आजही ठाणेकरांकडून व्यापक स्वरुपात त्यांची दखल घेतली गेलेली नाही. २००९ साली ‘एण्टरटेण्टमेण्ट के लिए कुछ भी करेगा’ या कार्यक्रमात त्यांनी पर्णवादन केले. नंतर २०१० साली ‘इंडिया गॉट टॅलेण्ट’मध्ये देखील त्यांनी आपली ही कला सादर केली होती. ती त्यांना लोकांसमोर आणायची आहे. तसेच, जागतिक पातळीवर एका वेगळ््या वादनाची नोंद करण्याची इच्छा आहे.