पनवेल आगाराची दुरवस्था

By admin | Published: May 23, 2014 03:53 AM2014-05-23T03:53:48+5:302014-05-23T03:53:48+5:30

पनवेल बस आगाराची प्रचंड दुरवस्था झाली असून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. बीओटी तत्त्वावर विकास होण्यास विलंब लागत असल्याने परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे

Panvel Agra Drought | पनवेल आगाराची दुरवस्था

पनवेल आगाराची दुरवस्था

Next

पनवेल : पनवेल बस आगाराची प्रचंड दुरवस्था झाली असून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. बीओटी तत्त्वावर विकास होण्यास विलंब लागत असल्याने परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पनवेलचे बस आगार म्हणजे चक्क कचरा टाकायचा डेपो बनल्यासारखीच परिस्थिती झाली आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पहाणी करुन व्यवस्थापनाला फैलावर घेतले. महामार्गाच्या कडेला आणि शहराच्या प्रवेशव्दारावर २० हजार चौरस मीटर क्षेत्रावर १९७० साली पनवेल बस आगाराचे बांधकाम करण्यात आले होते. त्या ठिकाणी तीन बसस्थानके, कार्यशाळा, प्रशासकीय इमारत, गेस्ट हाऊस आदींचा समावेश आहे. पनवेलचे बस आगार मुंबई विभागातील मोठे आगार असून येथून डोंबिवली, कल्याण, मुंब्रा, दादर, वाशी, बेलापूर आणि तालुक्यातील गावांमध्ये बस सोडल्या जातात. या व्यतिरिक्त शिर्डी, अहमदनगर, धुळे, कराड, फलटण या ठिकाणी लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू आहेत. तसेच गर्दीच्या वेळी पनवेल आगारातून अतिरिक्त बसची व्यवस्थाही केली जाते. या ठिकाणी ७९ बसेस असून त्या सुस्थितीत असल्याचा मंडळाचा दावा आहे. एकेकाळी मुंबई विभागात प्रवासी वाढवा मोहिमेत अग्रभागी असलेले हा डेपो सध्या तोट्यात चालला आहे. याबरोबर हा परिसर पूर्णत: खड्ड्यात गेला असून जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले असून आगार खड्ड्यात की खड्डे आगारात असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर अस्वच्छतेचे माहेरघर म्हणून पनवेल बसस्थानकाकडे पाहिले जात आहे. यासारख्या अनेक समस्यांच्या चक्रव्यूहात पनवेल आगार गुंतले असून त्याबाबत दररोज तक्रारी सुरू आहेत. त्यांनी अंतर्गत रस्त्यांची पाहणी करीत पावसाळ्याच्या अगोदर खड्डे बुजवले जातील का, असा सवाल उपस्थित केला. लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. पनवेल बस आगारातील स्वच्छतागृह महिला आणि मुलांसाठी नि:शुल्क असताना या ठिकाणी पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारींची आमदारांनी दखल घेत याबाबत संबंधित एजन्सीला जाब विचारला. त्याचबरोबर एसटीच्या शौचालयाच्या दुरवस्थेबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि या ठिकाणी स्वच्छता ठेवून वरती तुटलेले पत्रे दुरूस्त करण्याच्या सूचना दिल्या. जिकडे तिकडे कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य दस्तुरखुद्द पनवेलच्या विधिमंडळाच्या सदस्याने अनुभवले. या ठिकाणी हजारो प्रवासी दररोज ये-जा करतात, बाहेरगावावरून एसटी येतात असे असताना स्वच्छता का ठेवली जात नाही, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. महामंडळाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून साफसफाईची कामे व्यवस्थित करून घ्या, असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर यावेळी पिण्याचा पाण्याचा विषयही उपस्थित करण्यात आला. लोकसहभागातून पाणपोई उभारण्याचा सल्लाही एसटीच्या अधिकार्‍यांना देण्यात आला.

Web Title: Panvel Agra Drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.