नववर्षाच्या तोंडावर पनवेल शहर हादरले
By admin | Published: December 29, 2016 02:45 AM2016-12-29T02:45:12+5:302016-12-29T02:45:12+5:30
पनवेल शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती हातपाय पसरू लागली आहे. मागील काही महिन्यांत शहरातील गुन्हेगारी कारवायांत वाढ झाली आहे. बुधवारी येथील विचुंबे परिसरात
नवी मुंबई : पनवेल शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती हातपाय पसरू लागली आहे. मागील काही महिन्यांत शहरातील गुन्हेगारी कारवायांत वाढ झाली आहे. बुधवारी येथील विचुंबे परिसरात बाप-लेकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली, तर याच दिवशी दोन बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. या गंभीर स्वरूपाच्या घटनांमुळे पनवेल शहर पुरते हादरून गेले आहे.
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विचुंबे गावात बुधवारी संध्याकाळी दोघा बाप-लेकाची निर्घृण हत्या करण्यात आली. लक्ष्मण म्हात्रे व रूपेश म्हात्रे अशी हत्या झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत. ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी मंगेश गणपत म्हात्रे, रवींद्र गणपत म्हात्रे, सुनीता गणपत म्हात्रे, वनिता भोपी व फसीबाई भोपी अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मृतांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात जमिनीचा वाद होता. याच वादातून त्यांच्यात बुधवारी सकाळी मारामारी झाली होती. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी दोन्ही गटांना समज देवून सोडून दिले होते. परंतु सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण म्हात्रे व रूपेश म्हात्रे यांचे त्यांच्या राहत्या घरी मृतदेह सापडले. लोखंडी रॉड आणि काठीने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेपूर्वी बुधवारी दिवसभर शहरात दोन बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी खांदेश्वर पोलीस ठाण्यात हद्दीतील आदई गावाजवळ एका तरूणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. मृतदेहाजवळ रॉकेलचा कॅन सापडल्याने त्याला रॉकेलने पेटवून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिसऱ्या घटनेत शहरातील सिमरन मोटर्स या शोरूमजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह छिन्नविच्छिन अवस्थेत असून त्यावरील पेहरावावरून ही महिला राजस्थानी असल्याचा अंदाज सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी व्यक्त केला आहे. मुंबई- पुणे महामार्गालगत ठाणा नाका थांब्यापासून खांदा गावात जाणारा रोड आहे. या रोडवर रहदारी कमी असल्याने अज्ञात मारेकऱ्यांनी सदर महिलेची हत्या करून तिचा मृतदेह येथील खड्ड्यात टाकून दिला आहे. मृतदेहाचे अनेक तुकडे करून एका निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून तो खड्ड्यात फेकून देण्यात आला आहे.
एकाच दिवशी घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे पनवेल शहर पुरते हादरून गेले आहे. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेमुळे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. तसेच शेजारच्या नैना क्षेत्रामुळे या परिसरातील जमिनीला सोन्याचे दर प्राप्त झाले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर या परिसरात गुन्हेगारांनी आपली पाळेमुळे रोवायला सुरूवात केली आहे. गेल्या काही महिन्यांत घडलेल्या विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांवरून पनवेल शहर आणि परिसर गुन्हेगारांचे माहेरघर तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
गुन्हेगारीत वाढ
पनवेल महापालिकेची लोकसंख्या दहा लाखांच्या घरात आहे. तसेच शहराच्या लगत विकसित होणाऱ्या नैना क्षेत्रात येत्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार आहेत. त्यामुळे भविष्यात पनवेल शहराला महत्त्व प्राप्त होणार आहे. असे असले तरी शहरात रूजू पाहणारी गुन्हेगारी संस्कृती शहराच्या स्वास्थ्याला मारक ठरणारी आहे. सध्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. खांदेश्वर व पनवेल शहर पोलीस ठाण्यात खून, घरफोडी, विनयभंग, चोरी, मालमत्तेच्या वादातून मारामारी, आर्थिक फसवणूक आदी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.