Join us  

पनवेल परिसर जलमय

By admin | Published: July 29, 2014 1:35 AM

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसर जलमय झाला आहे.

पनवेल : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसर जलमय झाला आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले असून कळंबोलीत बैठ्या घरांमध्येही पाणी शिरले होते. पनवेल शहरात सोमवारी सायंकाळपर्यंत १७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग दोन दिवस पाऊस कोसळत असल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायन - पनवेल महामार्गावर गार्डन हॉटेलजवळ वृक्ष मुळासकट उन्मळून पडला आहे. धुतपापेश्वर परिसरामध्येही झाड कोसळल्याची घटना घडली आहे. टपाल नाका परिसरातील काही कार्यालयांमध्ये व हॉटेलमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांना २६ जुलै २००५ च्या महाप्रलयाची आठवण झाली. शहरातील बावन बंगला, सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल, हरीओम नगर, उरण नाका परिसरातील रोडवरही एक ते दीड फूट पाणी साचले होते. यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला होता. मुसळधार पावसामुळे रोडवर वाहनांची संख्याही कमी असल्याचे निदर्शनास आले. शहराच्या बाहेरून वाहणाऱ्या पाताळगंगा व गाढी नदीचे पात्रही दुधडी भरून वाहत होते. कळंबोली परिसरातील अल्पउत्पन्न गटातील नागरिकांच्या बैठ्या चाळींमध्ये पाणी शिरले होते. पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचेही हाल झाले. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला.