प्रशांत शेडगे , पनवेलशहरीबहुल समजल्या जाणाऱ्या पनवेल शहरात २०१४ च्या तुलनेत सरत्या वर्षात स्त्री-जन्मदर शंभराने वाढला असला, तरी एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर कमी असल्याचे पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. नवीन वर्षात हे प्रमाण वाढविण्याकरिता मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचे या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.शासनाने जरी गर्भलिंग चाचणी विरोधी कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, हे संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे. मध्यंतरी करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार राज्यात ६ हजार ९३० सोनोग्राफी मशिन्स होत्या. त्यापैकी दीड हजार रायगड आणि नवी मुंबई परिसरात होत्या. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मशिन्सची संख्या जास्त त्या ठिकाणी मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत असल्याचे ‘लापता लडकी’ या अहवालात उघड झाले होते. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गर्भनिदान कायदा देखरेख समितीच्या अध्यक्ष वर्षा देशपांडे स्ट्रिंग आॅपरेशन करून अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना तुरुंगाची हवा खाण्यास पाठवली. मात्र नवी मुंबई आणि रायगड परिसरात अशा प्रकारे धाडसत्रं फारशी झालेली नाहीत. काही दिवसांपूर्वी सोनोग्राफी मशिन्सच्या नोंदणीचे नूतनीकरण न करणे, माहिती व्यवस्थित न ठेवणे त्यामुळे संशयाची सुई असलेल्या दोन वैद्यकीय व्यावसायिकांना पनवेल न्यायालयाने शिक्षा दिली. २०११ मध्ये जनगणना झाली, त्याचबरोबर नव्याने मतदार नोंदणीही झाली. त्या आकडेवारीहून पनवेल परिसरातील महिलांचे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ९०० च्याही खाली गेले. २००८ मध्ये झालेल्या एका पाहणीत हे प्रमाण ९४१ होते. ते खाली घसरून ८६५ वर आले आहे. पनवेल नगरपालिका हद्दीत पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहतीचा समावेश होतो. या भागातील रु ग्णालयांत २०१४ मध्ये ३,००४ मुले आणि २,७७४ मुली जन्माला आल्या. जवळपास सव्वादोनशे मुली कमी जन्माला आल्याचे उघड झाले. २०१५ मध्ये ५,९२४ बालके जन्मली. त्यापैकी ३,०४२ मुले आणि २,८८२ मुली आहेत. जवळपास १६०चा फरक या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे एक हजार पुरुषांमागे ९४७ स्त्रिया जन्माला आल्या. आज हे प्रमाणसुद्धा कमी असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या वंदना बामणे यांनी व्यक्त केले. याकरिता मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता असल्याचेही त्या म्हणाल्या.
पनवेलमध्ये स्त्री-जन्मदर कमी
By admin | Published: January 06, 2016 1:10 AM