पनवेल-कर्जत लोकल सेवा चार वर्षांत होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 05:24 AM2019-01-29T05:24:35+5:302019-01-29T05:25:05+5:30

प्रवाशांना खूशखबर; २ हजार ७८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

The Panvel-Karjat local service will continue to be in four years | पनवेल-कर्जत लोकल सेवा चार वर्षांत होणार सुरू

पनवेल-कर्जत लोकल सेवा चार वर्षांत होणार सुरू

Next

मुंबई : पनवेल आणि कर्जत या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी लोकल सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. एकूण २९ किमी अंतर लोकलद्वारे जोडण्यात येणार असल्याने पनवेल ते कर्जतपर्यंत राहणाऱ्या नागरिकांना या लोकल सेवेचा फायदा होईल. मात्र, ही सेवा सुरू होण्यास किमान तीन ते चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे पनवेल-कर्जत दोन मार्गिकांचे काम सुरू करण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी एक मार्गिका असून आणखी दोन मार्गिका तयार करण्यात येतील. सद्य:स्थितीत एका मार्गिकेवरून मेल, एक्स्प्रेस धावतात. या प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणाºया दोन मार्गिकांवर फक्त लोकल चालविण्यात येतील. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीनअंतर्गत पनवेल-कर्जत नवीन दोन मार्गिकांचे काम सुरू करण्यात येत आहे.

पनवेल-कर्जत लोकल सेवेच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदेचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मिळाली. या प्रकल्पासाठी राज्य सरकार, केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यासह बँकेतून कर्ज घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २ हजार ७८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या लोकल सेवेमुळे पनवेल आणि कर्जत दरम्यान राहणाºया नागरिकांना या लोकल सेवेचा मोठा फायदा होणार आहे. यासह मुंबई-पुणे या दरम्यान लोकल प्रवास करण्यासाठी देखील प्रवाशांना याचा फायदा होईल. पनवेल-कर्जत प्रकल्पामुळे वेळेची बचत होईल. नवी मुंबई विमानतळाची उभारणी होत असल्याने विमानतळापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना या नव्या लोकल सेवेचा फायदा होईल.

पाच स्थानकांचा समावेश
पनवेल-कर्जत मार्गावर पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असतील.
कल्याण ते कर्जत येथे राहणाºया नागरिकांना पनवेलला जाण्यासाठी सध्या मध्य रेल्वेने कुर्ला गाठून हार्बर रेल्वेने पनवेलला जावे लागत आहे. मात्र पनवेल-कर्जत लोकल सेवा सुरू झाल्यास सरळ कर्जतमार्गे पनवेल गाठता येणार आहे.

असा आहे एमयूटीपी ३ प्रकल्प
पनवेल ते कर्जत २९ किमी.
खर्च २ हजार ७८३ कोटी रुपये.
अंदाजे ३ ते ४ वर्षांचा कालावधी लागणार.
दोन रेल्वे मार्गिका.
एक पनवेलकडे जाणारी तर दुसरी कर्जतकडे जाणारी.

Web Title: The Panvel-Karjat local service will continue to be in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.