आजपासून पनवेल ‘महानगरपालिका’

By admin | Published: October 1, 2016 03:01 AM2016-10-01T03:01:43+5:302016-10-01T03:01:43+5:30

देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असलेले पनवेल १ आॅक्टोबरपासून महापालिका म्हणून ओळखले जाणार आहे. पनवेल राज्यातील २७ वी व रायगड जिल्ह्यातील पहिली

Panvel 'Mahanagarpalika' from today | आजपासून पनवेल ‘महानगरपालिका’

आजपासून पनवेल ‘महानगरपालिका’

Next

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असलेले पनवेल १ आॅक्टोबरपासून महापालिका म्हणून ओळखले जाणार आहे. पनवेल राज्यातील २७ वी व रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका ठरली असून, जवळपास २५ वर्षांपासूनचे शहरवासीयांचे स्वप्न साकार झाले आहे.
पनवेल महापालिका होणार की नगरपालिकाच राहणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नगरपालिका व २९ गावे मिळून महापालिका अस्तित्वात आली आहे. शनिवारी नगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये शासनाच्यावतीने आयुक्तांची नियुक्ती होणार असून ते प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी मंगेश चितळे नवीन महापालिकेचे उपआयुक्त असणार आहेत. पहिल्या दिवशी महापालिकेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींची कागदपत्रे महापालिकेकडे सुपूर्द केली जाणार आहेत. ग्रामपंचायत संपुष्टात येवून तो परिसरही महापालिका म्हणून ओळखला जाणार आहे. ग्रामपंचायतींची कार्यालये व कर्मचारीही महापालिकेकडे हस्तांतर केले जाणार आहेत. पनवेल नगरपालिकेची स्थापना २५ आॅगस्ट १८५२ मध्ये झाली. देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या पनवेलच्या परिसराचेही शहरीकरण झाल्याने नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्याची मागणी २५ वर्षांपासून केली जात होती. शासनाने ९ डिसेंबर २०१५ ला कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने ६ मे २०१६ रोजी शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने अधिसूचना काढून महापालिका स्थापण्याची कार्यवाही सुरू झाली. अखेर १ आॅक्टोबरला प्रत्यक्षात महापालिका अस्तित्वात येत आहे. राज्यातील २७ वी व रायगड जिल्ह्यातील महापालिका म्हणून पनवेल ओळखले जाणार आहे.
नवीन महापालिकेमध्ये नगरपालिका, तळोजा एमआयडीसी परिसर व पनवेल तालुक्यातील एकूण २९ महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे. ११० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा समावेश असणार असून २०११ च्या जनगणनेप्रमाणे ५ लाख लोकसंख्या असणार आहे. ग्रामपंचायत, सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए , नगरपालिका, जिल्हा परिषद परिसराचा महापालिकेत समावेश असणार आहे. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतर केल्या जाणार आहेत. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्याने शहरवासीयांनी आनंद व्यक्त केला आहे. यापुढे विकासकामे झपाट्याने होतील. विशेषत: सिडको कार्यक्षेत्र, गावठाण परिसरामध्ये ठप्प असणारी कामे मार्गी लागतील असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी आयुक्त प्रशासक म्हणून पदभार स्वीकारणार असून इतर प्रशासकीय कामे होतील, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली.

‘ड’ वर्ग महापालिका
नवीन निवडणुका होईपर्यंत पनवेल शहराच्या विकासाची सूत्रे आय.ए.एस. अधिकारी असलेल्या आयुक्तांकडे जाणार आहेत. त्यामुळे आयुक्त कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारखे आयुक्त आल्यास पनवेलचा चांगला विकास होऊ शकतो असे काहींना वाटते. पनवेल शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी रस्ते रुंदीकरणाची गरज आहे. याशिवाय पार्र्किं गची समस्या शहरात दिवसन्दिवस गंभीर होत आहे. त्यासाठी धाडसी निर्णय घेणारा अधिकारी गरजेचा आहे. असा धाडसी अधिकारी मिळावा असे सामान्य माणसाला वाटते.

जनमत तयार करण्याचे काम; सातत्याने मांडल्या समस्या
1)पनवेल महानगरपालिका व्हावी यासाठी ‘लोकमत’ने २०१३ पासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. विशेष लेखमालेसह या परिसरातील समस्यांवर सातत्याने आवाज उठवून विकासामध्ये सुसूत्रता येण्यासाठी महापालिकेची गरज असल्याची भूमिका मांडली होती. नोव्हेंबर २०१३ मध्ये सिडको कार्यक्षेत्रामधील खारघर नोड नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्याची चर्चा सुरू झाली. शासन याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी खारघर हा पनवेलचा अविभाज्य भाग असून तो नवी मुंबईमध्ये सहभागी होवू न देण्याची भूमिका घेतली.
2)पनवेलचे महापालिकेमध्ये रूपांतर करून सिडको नोडचा त्यामध्ये समावेश करावा अशी मागणी होवू लागली होती. ‘लोकमत’ने डिसेंबर २०१३ मध्ये ‘वेध महापालिकेचे’ ही विशेष लेखमाला सुरू केली. यामध्ये तळोजा औद्योगिक वसाहतीसह सिडको नोड व त्यामधील गावांची महापालिका करण्यात यावी. महापालिका झाल्यास या परिसराचा विकास कसा होवू शकतो याविषयी सविस्तर माहिती दिली होती. याविषयी तज्ज्ञांची मतेही मांडली होती.

Web Title: Panvel 'Mahanagarpalika' from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.