Join us

पनवेलचे बाजार गजबजले

By admin | Published: October 22, 2014 1:21 AM

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पनवेलची बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.

पनवेल : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पनवेलची बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. त्यातच सुट्टीसाठी गावी जायला निघालेल्या चाकरमान्यांमुळे महामार्गावरही वाहनांची संख्या वाढली ज्यामुळे दिवसभर पनवेलमध्ये वाहतूक कोंडी झाली.दिवाळी हा सण हा आनंद, उत्साह त्याचबरोबर प्रकाशमय जीवनाचे प्रतिक आहे. दिपोत्सव म्हणून दिवाळी ओळखली जाते. शाळांना सुट्टी, त्याचबरोबर नवीन कपडे, फटाक्यांची आतषबाजी आणि फराळाची मेजवानी यामुळे बच्चे कंपनीच्या आनंद गगनात मावत नाही. या सणानिमित्त कुटुंबे एकत्र येतेच, शिवाय अनेक जण आपल्या मुळ गावी जातात. आज पनवेलच्या ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. फराळाचे साहित्य, मिठाई, कपडे, फटाके पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी पनवेल, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातून लोक आले होते. कापड बाजार त्याचबरोबर सराफी पेढयाही गर्दीने फुलून गेल्या होत्या. मिठाई , किराणा दुकानात मिठाई आणि गोड-धोड पदार्थ तयार करण्यासाठी किराणा घेणाऱ्यांची लगबग दिसत होती. याशिवाय भाजी मार्केटमध्ये फुले आणि हारांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. दिवाळी खरेदीच्या निमित्ताने तालुक्यातून आज हजारो वाहने शहरात आल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. दिवाळीकरीता शाळांना सुट्टी असल्याने अनेकजण आपल्या मूळ गावाला रवाना झाले. परिणामी, घाटमाथ्यावरील एसटी गाडयांमध्येही मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत होती. (प्रतिनिधी)