वैभव गायकर,पनवेलशहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सहावरून आठवर पोहचली आहे. तसेच संशयित रुग्णांची संख्या देखील २१ झाली आहे. त्यामुळे पनवेल नगरपरिषद सतर्क झाली असून शहरात डुक्कर पाळणाऱ्यांना नोटिसा बजावून डुकरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूचे एच१एन१ या विषाणू संसर्ग झालेल्या डुकरांपासून पसरतात. पनवेल शहरामध्ये स्वाइन फ्लूचे एकूण चार रुग्ण आहेत. हे चारही रुग्ण ठाणा नाका परिसरातील आहेत. या परिसरात डुकरांचा वावर सर्वात जास्त आहे. वातावरणातील बदलांमुळे हा आजार फोफावतो. त्यामुळे नगरपरिषदेने शहरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. नगरपरिषदेकडे शहरातील डुकरांचा अधिकृत आकडा उपलब्ध नसला तरी डुकरांचे पालन करणाऱ्या सर्वच व्यावसायिकांना नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. पनवेल नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक डॉॅ. दिलीप कदम म्हणाले की, नगरपरिषदेच्या वतीने स्वाइन फ्लूच्या निवारणासाठी तत्काळ पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी शहरात जनजागृतीपर फलक लावले आहेत, तसेच शहरात दवंडी पिटण्यात आली आहे. स्वाइन फ्लूच्या निवारणासाठी दक्षता म्हणून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात एकूण १३ कर्मचारी कार्यरत आहेत. जंतुनाशक फवारणी, धुरीक रण आदीची जबाबदारी या पथकावर असणार आहे. तसेच १० जणांचे पथक देखील यासाठी नियमित कार्यरत असणार आहे. विशेष कक्षएमजीएम रुग्णालय, कामोठे येथे २० खाटांचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एच१एन१ संशयित रुग्ण व लागण झालेल्या रुग्णांवर देखरेख ठेवली जाणार आहे. त्यांच्यावर स्वाइन फ्लू निवारणासाठी औषधोपचार केले जाणार आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. लोहारे यांनी दिली. याठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास अधिक माहितीसाठी ग्रामीण रुग्णालय, पनवेल याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.पनवेलमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या चार आहे. उर्वरित चार रुग्ण कामोठे, नेरे, खैरणे आदी ग्रामीण भागातील आहेत. नगरपरिषदने स्वाइन फ्लू निवारणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे, मात्र ग्रामीण भागात उपाययोजना केलेल्या नाहीत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोकाट डुकरांचा वावर आहे. याबाबत संबंधित आरोग्य विभाग काय उपाययोजना राबवणार आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने ग्रामीण भागात ही साथ पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेलला स्वाइन फ्लूचा धोका
By admin | Published: August 18, 2015 3:08 AM