नवी मुंबई : प्रस्तावित विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने पनवेल-उरण रेल्वे मार्गाची सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरण हे दोन तालुके रेल्वेने जोडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबईत सध्या वाशी ते पनवेल आणि पनवेल ते ठाणे असे रेल्वेचे जाळे विणले गेले आहे. या रेल्वे मार्गाच्या उभारणीत सिडकोचा ६७ टक्के समभाग आहे. सीवूड-उरण रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याच्या जोडीला आता पनवेल ते उरण दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्याचा सिडकोचा मानस आहे. या प्रस्तावित मार्गासाठी सिडकोने जमिनी राखून ठेवल्या आहेत. उरणमध्ये जेएनपीटी, ओएनजीसी तसेच मोठमोठे वेअर हाऊसेस यामुळे उरणकडे एक औद्योगिक नगरी म्हणून पाहिले जाते. या परिसरातील चाकरमान्यांना प्रस्तावित पनवेल-उरण मार्ग सोयीचा ठरणार आहे. सिडकोने सध्या या मार्गाची प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे. त्याचा प्राथमिक आराखडाही तयार करण्यात आला आहे. भविष्यात सोयीनुसार या आराखड्यात बदल होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. असे असले तरी प्रस्तावित विमानतळाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतरच या मार्गाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येईल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पनवेल-उरण रेल्वेची सिडकोकडून चाचपणी
By admin | Published: September 12, 2014 12:55 AM