पनवेलकरांच्या दारी महानगर गॅस
By admin | Published: July 18, 2014 12:47 AM2014-07-18T00:47:50+5:302014-07-18T00:47:50+5:30
मुंबईप्रमाणे आता लवकरच पनवेल परिसरातील रहिवाशांना पाईपलाईनद्वारे गॅस प्राप्त होणार आहे. त्यामुळे आगामी काळात सिलेंडरवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
पनवेल : मुंबईप्रमाणे आता लवकरच पनवेल परिसरातील रहिवाशांना पाईपलाईनद्वारे गॅस प्राप्त होणार आहे. त्यामुळे आगामी काळात सिलेंडरवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि सिलेंडरच्या कटकटीतून पनवेलकरांची मुक्तता होणार आहे. परिसरातील पाईपलाईनचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून या वर्षाअखेर जोडणी करुन प्रत्यक्ष गॅसचा पुरवठा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी बुधवारी दिले.
पनवेल परिसराची लोकसंख्या साडे आठ लाखांवर पोहोचली आहे. याठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच अनेक मोठमोठे प्रकल्प येत असून महानगराच्या दिशेने शहराची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे पनवेल परिसरात विविध पायाभूत सुविधांचे जाळे पसरविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सिडको वसाहती आणि पनवेल शहराला गॅस पुरवठा करण्यासाठी महानगर गॅस निगम लिमिटेडद्वारे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे.
सुरुवातीला खारघर वसाहतीपर्यंत गॅसच्या वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. आता या वाहिन्या पनवेल, शेंडुगपर्यंत विस्तारण्यात आल्या असून त्याचे काम सध्या सुरु आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन पनवेलकरांना प्रत्यक्ष जोडणी करुन गॅस पुरवठा व्हावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लावून धरली आहे. त्यानुसार आज खांदा वसाहतीतील सीकेटी महाविद्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी महानगर गॅसचे मुख्य व्यवस्थापक जी. जे. मूर्ती, प्रकल्प व्यवस्थापक विनायक महामने, व्यवस्थापक पी. दिनेश, नगराध्यक्षा चारुशिला घरत, नगरसेवक मनोहर म्हात्रे, अशोक खरे, के. जी. म्हात्रे, श्रीकांत बापट उपस्थित होते.
खारघरमध्ये काम पूर्ण झाले असून कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहतीत येथे कामे सुरु असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. महानगर गॅस सिलेंडरपेक्षा सुरक्षित असल्याने अपघात, स्फोटासारख्या घटना कमी आहेत. व्यतिरिक्त महानगर गॅस दर माफक असल्याने ग्राहकांना परवडेल, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
सिडको प्रशासनाकडून परवानग्या आणि सहकार्य मिळत नसल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार आपण सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व अडथळे दूर करु अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. (वार्ताहर)