Join us

पनवेलचे नियोजन अडकले लालफितीत

By admin | Published: June 10, 2015 10:30 PM

सुनियोजित शहर म्हणून पनवेल शहराचा विकास करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सहा वर्षांपूर्वी शहराच्या नियोजनाबाबत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती

प्रशांत शेडगे, पनवेलसुनियोजित शहर म्हणून पनवेल शहराचा विकास करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सहा वर्षांपूर्वी शहराच्या नियोजनाबाबत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. तसा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यातही आला होता. मात्र ही फाईल धूळखात पडल्याने शहराच्या विकासात अडथळे येत आहेत. पनवेल शहराकरिता १७ एप्रिल १९६४ रोजी अधिसूचना जाहीर होऊन पहिली टीपी (टाऊन प्लॅनिंग) स्कीम मंजूर करण्यात आली. तत्कालीन लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले होते. परंतु गेल्या काही वर्षांत पनवेल शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. शहरातील ऐतिहासिक, मोडकळीस आलेले वाडे आणि चाळी जमीनदोस्त करून त्याठिकाणी टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे शो रूम्स, मॉल्सबरोबरच व्यापारी संस्था, राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँका आणि खाजगी कार्यालयांची संख्या वाढली आहे. परिणामी पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. शहरासाठी आवश्यक पायाभूत सुविधांना प्रस्ताव नगरपरिषदेने नगरविकास विभागाकडे नव्याने पाठवण्यात आला आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने १३ आॅगस्ट २00९ रोजी अधिसूचनाही काढली. मात्र गेल्या सहा वर्षात याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. काही शासकीय भूखंडावरील नियोजित प्रकल्पही रखडले आहे. शिवाय शहराच्या नियोजनातही अडचणी येत आहेत.