पपई, आंब्यांचे दर गगनाला भिडले
By admin | Published: June 3, 2017 06:51 AM2017-06-03T06:51:09+5:302017-06-03T06:51:09+5:30
राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाचा मोठा फटका मुस्लीम बांधवांना बसू लागला आहे. मुंबईसह देशात रमजानचा पाक
अक्षय चोरगे/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाचा मोठा फटका मुस्लीम बांधवांना बसू लागला आहे. मुंबईसह देशात रमजानचा पाक महिना सुरू असून, इफ्तारीसाठी आवश्यक फळांचा तुटवडा शुक्रवारपासून जाणवू लागला आहे. त्यामुळे फळांच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली असून, संप चिघळल्यास फळांशिवाय इफ्तार पार्टी आयोजित करण्याची वेळ मुस्लीम बांधवांवर येऊन ठेपली आहे.
दिवसभराचा रोजा पाळल्यानंतर सायंकाळी मुस्लीम बांधव इफ्तारीचे आयोजन करत आहेत. शरीरातील प्रथिने आणि पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी फळे हा स्वस्त आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळे रमजानच्या महिन्यात फळांना अधिक मागणी असते. फळ विक्रेत्यांसाठीही इतर महिन्यांच्या तुलनेत रमजान हा विक्रीपासून नफ्यापर्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. गेल्या आठवड्यापर्यंत फळांच्या मागणीएवढीच आवकही होती. शुक्रवारपासून आवक खूपच कमी झाल्याने, विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजघडीला ३०० रुपये डझन भावाने विकणारे आंबे उद्या ४०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
- शंकर दातखिळे,
आंबा विक्रेते
गोदामामध्ये माल साठवून ठेवला आहे. मात्र, शनिवारी फळांची आवक आली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम फळांच्या किमतीवर होतील.
- इरफान खान, फळ विक्रेता
ंरमजान असल्याने फळांची मागणी खूपच वाढली आहे. संपाचा अधिक परिणाम राज्यांतर्गत फळ वाहतुकीवर झाला असून, इतर राज्यांतील फळांची आवक सुरू आहे. त्यामुळे राज्यांतर्गत फळ विक्रेत्यांना संपाचा अधिक फटका बसेल.
- गणेश शिंदे, विक्रेते
पपईच्या किमतीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. १५ ते २० रुपये प्रति नग दराने विकली जाणारी पपई शुक्रवारी ३० ते ४० रुपये प्रति नग दराने विकली जात आहे.
- आप्पा पाटील, फळ विक्रेता