महाराष्ट्र बंदमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचा आता सहा जानेवारीला पेपर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 04:17 PM2018-01-04T16:17:27+5:302018-01-04T16:20:58+5:30
महाराष्ट्र बंदमुळे परीक्षेची संधी हुकलेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देता येणार आहे.
मुंबई - महाराष्ट्र बंदमुळे परीक्षेची संधी हुकलेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देता येणार आहे. महाराष्ट्र बंदमुळे रद्द झालेले पेपर येत्या सहा जानेवारीला होणार आहेत. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी प्रकाश आंबेडकर यांच्या भरिप-बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंद दरम्यान मुंबईत अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. मोर्चे निघाले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही.
बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या एकूण 13 परीक्षा होत्या. मुंबईतील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने काल विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर एक तास उशिराने पोहोचण्याची मुभा दिली होती. ज्यांचा अकराचा पेपर आहे त्यांना बारा आणि ज्यांचे तीनचे पेपर आहेत त्यांना चार वाजेपर्यंत पोहोचण्याची मुभा होती.
पण अकरानंतर परिस्थिती बिघडत गेली जाळपोळ, तोडफोड, रास्ता रोको यामुळे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. महत्वाचे मार्ग आंदोलकांनी रोखून धरले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अशीच स्थिती होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना आता पुन्हा सहा जानेवारीला पेपर देता येणार आहे.