बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 06:20 AM2024-06-07T06:20:27+5:302024-06-07T07:04:05+5:30

एकाच केंद्रावरील मुलांना शंभर पर्सेंटाईल, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात

Paper leak in Bihar, intense anger among Maharashtra parents, credibility of NEET UG under threat | बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात

बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात

मुंबई : बिहारमधील पेपरफुटी, ठरावीक विद्यार्थ्यांना दिले गेलेले ग्रेसमार्क, एकाच केंद्रावरील अनेक विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळणे, अंतिम उत्तरसूची जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने निकाल जाहीर करणे, अशा विविध कारणांमुळे नीट-यूजीच्या निकालाविषयी विद्यार्थी-पालकांमधील रोष वाढत चालला आहे. नीट-यूजीच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित झाल्याने देशभरातून ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होत आहे.

एमबीबीएस, डेंटलच्या प्रवेशाकरिता एकेका गुणासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची चढाओढ असते. परंतु, यंदा ज्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात, त्या नीट-यूजीच्या विश्वासार्हतेविषयीच संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षेतील समन्यायी आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून पालक-विद्यार्थी समाजमाध्यमांतून आपल्या रागाला वाट करून देत आहेत. यात मेडिकलचे विद्यार्थी,  डॉक्टर यांचाही समावेश आहे. ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) विश्वासार्हतेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशभरातून २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

पालकांचे प्रश्न
१०० पर्सेंटाईल मिळालेल्या ६७ विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रावरील कसे?
नीट-यूजीचा निकाल १४ जूनला लागणार होता. त्याऐवजी तो दहा दिवस आधीच लावण्यात आला. त्याच्या दोन दिवस आधीच ‘एनटीए’ने अंतिम उत्तरसूची जाहीर केली होती. उत्तरसूचीनंतर निकाल अवघ्या दोन दिवसांत तयार कसा झाला?
तब्बल ६७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. आतापर्यंत दोन-तीन विद्यार्थ्यांनाच १०० पर्सेंटाईल मिळत आले आहेत. इतक्या मुलांना परफेक्ट गुण कसे मिळाले?

नीट-यूजीचा पेपर बिहारमध्ये फुटल्याची तक्रार होती. त्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून पेपरच्या बदल्यात ३० ते ५० लाख घेण्यात आल्याची पोलिसांनीच उघड केली होती. यात एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे. यात जवळपास २० जणांना परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका मिळाल्याची माहिती आहे. मात्र, या पेपरफुटीची पर्वा न करता घेतलेली परीक्षा कायम ठेवण्यात आली. यावरून सुप्रीम कोर्टात एक याचिका प्रलंबित आहे.
अनेक विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण मिळाले आहेत. ‘नीट’च्या मूल्यांकनाचे स्वरूप पाहता असे गुण मिळणे शक्य नाही. यावर वेळ कमी पडल्याने आणि एनसीआरटीईच्या जुन्या अभ्यासक्रमावरून एक प्रश्न विचारला गेल्याने दिलेल्या ग्रेस मार्कमुळे असे गुण मिळाल्याचा त्रोटक खुलासा ‘एनटीए’ने सुरुवातीला केला. 

आज वैद्यकीय मंत्र्यांना भेटणार
या गोंधळामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने राज्यातील पालक उद्या, शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेणार आहेत.

फेरपरीक्षेला काहींचा विरोध
नीट यूजीच्या फेरपरीक्षेची मागणी पालकाकडून होत असली तरी महाराष्ट्रातून काही पालकांकडून याला विरोध होत आहे. हा महाराष्ट्रासाठी फारसा चांगला पर्याय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दिलेले ग्रेस मार्क काढून सुधारित निकाल लावा, अशी मागणी या पालकांकडून होत आहे.

राजकीय पक्षांची उडी
नीट-यूजीच्या निकालावरून उभ्या राहिलेल्या वादात राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. हरयाणातील एकाच सेंटरवरील आठ जणांना १०० पर्सेंटाईल कसे मिळाले, असा प्रश्न काँग्रेसने आपल्या समाजमाध्यमांवर केला आहे.

एनटीए म्हणते...
ग्रेस मार्क सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार दिले आहेत. एकूण १,५६३ विद्यार्थ्यांना वेळ कमी दिला गेल्याने ग्रेस मार्क दिले. त्या त्या सेंटरवरील सीसीटीव्ही फुटेज पाहून, खात्री करूनच ग्रेस मार्क दिले गेले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींची संख्या तीन लाखांनी वाढल्याने टॉपर्सची संख्या ६७ वर गेली आहे.
भौतिकशास्त्रासंबंधीच्या चुकीच्या प्रश्नासाठी काहींना ग्रेस मार्क देण्यात आले. ६७ टॉपर्सपैकी ४४ जणांना चुकीच्या प्रश्नासाठी तर सहा जणांना वेळ कमी दिला गेल्याने ग्रेसमार्क दिले गेले आहेत.
सर्व टॉपर्स देशाच्या विविध भागांतून आहेत. एकाच सेंटरवरील नाहीत.
पेपरफुटीत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. नीटचे पेपर सोशल मीडियावर आढळून आले नाहीत. त्यामुळे त्याला पेपरफुटी म्हणता येणार नाही.

Web Title: Paper leak in Bihar, intense anger among Maharashtra parents, credibility of NEET UG under threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.