Join us

पेपरफुटी प्रकरण : ‘विस्डम क्लासेस’च्या मालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:51 AM

अंबरनाथमधील विस्डम क्लासेसचा मालक मुनीर मुस्ताक शेख (२९) याच्या मुसक्या दया नायक आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री आवळल्या आहेत.

मुंबई - अंबरनाथमधील विस्डम क्लासेसचा मालक मुनीर मुस्ताक शेख (२९) याच्या मुसक्या दया नायक आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री आवळल्या आहेत. अंबोली पेपरफुटी प्रकरणातील ही सातवी अटक आहे. त्याने पाच प्रश्नपत्रिका ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे.औरंगाबादमध्ये मुख्य आरोपी फिरोज खान याच्या शिकवणीची शाखा सांभाळणाऱ्या, आतिश कदम याला गुरुवारी कल्याणमधून नायक यांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने ज्या लोकांची नावे घेतली आहेत, त्यापैकी मुनीर हा एक आहे. अंबरनाथमध्ये असलेल्या मुनीरच्या ‘विस्डम क्लासेस’मध्ये दहावीचे चाळीस विद्यार्थी आहेत. त्यांना मुनीरने बोर्डाच्या पाच प्रश्नपत्रिका पुरविल्या, अशी त्याने कबुली दिली आहे. ज्याच्या बदल्यात त्याने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठी फी आकारल्याची माहिती आहे. या प्रश्नपत्रिका मुनीरला कदमने व्हॉट्सअ‍ॅपमार्फत पुरविल्याचे चौकशीत उघड झाले आहे. पोलिसांनी मुनीरचा मोबाइल हस्तगत केला आहे, तसेच त्याने पोलिसांना चौकशी दरम्यान सहा जणांची नावे दिली आहेत, ज्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांनी अजून कोणाकोणाला या प्रश्नपत्रिका पाठविल्या, अन्य साथीदार कोण आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. यापूर्वीदेखील त्याने अशा प्रकारे प्रश्नपत्रिका पुरविल्या असल्याचा संशय अंबोली पोलिसांना आहे. तसेच अजून काही लोक तपास अधिकाºयांच्या रडारवर असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :अटकमुंबई