'पपॉन सरांनी काहीच चुकीचं केलं नाही', स्पर्धक मुलीची मीडियासमोर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 12:19 PM2018-02-24T12:19:28+5:302018-02-24T13:34:16+5:30
पपॉन याने टेलिव्हिजनवरील एका रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक असणाऱ्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्यामुळे अडचणीत अडकला आहे
मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक पपॉन सध्या वादात अडकला असून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. पपॉन याने टेलिव्हिजनवरील एका रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक असणाऱ्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्यामुळे अडचणीत अडकला आहे. त्याच्यावर बाल गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यातंर्गत (पॉस्को) गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र यादरम्यान ज्या स्पर्धक मुलीचे चुंबन घेण्यात आले होते तिने पपॉन सरांनी काहीच चुकीचं केलं नसल्याचा दावा केला आहे. स्पर्धक मुलीने एक व्हिडीओ शूट केलेला असून, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुलीसोबत तिचे पालक आणि इतर स्पर्धकही दिसत आहेत.
स्पर्धक मुलगी व्हिडीओत सांगत आहे की, 'आमचा होळीचा एपिसोड झाला होता. त्यानंतर पपॉन सरांकडे आम्ही सगळी मुलं आणि त्यांचे पालक गेलो होते. तिथे फेसबुक लाईव्ह सुरु होतं. आम्ही सगळे मस्ती करत होतो. गाण्यावर डान्स करत होतो. सगळ्यांनी पाहिलं पपॉन सरांनी काही चुकीचं केलं नाही. त्यांनी फक्त मला एक किस दिला. माझे आई, पप्पा सगळे मला किस देतात त्याचप्रमाणे त्यांनी किस केला. त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये'.
काय आहे प्रकरण -
'व्हॉईस ऑफ इंडिया' या टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शोच्या होळी स्पेशल भागाच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडला. पपॉन या कार्यक्रमात परीक्षक आणि स्पर्धकांचा मार्गदर्शक (मेंटॉर) आहे. होळी स्पेशल भागाचे चित्रीकरण झाल्यानंतर पपॉन सगळ्या लहान मुलांसोबत होळी खेळत होता. मात्र, त्याने यापैकी एका स्पर्धक मुलीच्या गालाला रंग लावल्यानंतर तिचे चुंबन घेतले. या सगळ्या प्रसंगाचे चित्रण करून तो व्हिडीओ पपॉनच्या फेसबूक पेजवर लाईव्ह करण्यात आला होता . सुरुवातीला ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र, हे फेसबुक लाईव्ह पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील वकील रुना भुयान यांनी आक्षेप घेत पपॉनविरुद्ध पॉस्को कायद्यातंर्गत तक्रार दाखल केली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. रूना भुयान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका अल्पवयीन मुलीशी अशाप्रकारचे वर्तन करणे धक्कादायक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला रिअॅलिटी शो मधील मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते. याठिकाणी स्पर्धकांमध्ये अनेक अल्पवयीन मुली आहेत. मात्र, त्यावेळी तिथे एकही महिला क्रू मेंबर नव्हती, असा आक्षेप रुना भुयान यांनी तक्रारीत नोंदवला आहे.