Join us

'पप्पू आता परमपूज्य' झाले, राज ठाकरेंकडून राहुल गांधींचे कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 8:22 PM

या निकालामुळे भाजपच्या विजयी रथाला ब्रेक लागला असून गुजरात अन् कर्नाटक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्या भाजपा कार्यलयात आज शांती-शांती दिसून येत आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर भाजपाला खोचक टोला लगावला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राज यांनी राहुल गांधींचे अप्रत्यक्षपणे कौतूक केलं आहे. विरोधकांकडून राहुल गांधींना पप्पू म्हटलं जातं, याबाबत राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, 'पप्पू आता त्यांच्यासाठी परमपूज्य' झाले असतील, असे राज यांनी म्हटले.  

देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त केले. यावेळी राज यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर टाकाही केली. तसेच जनतेनं आगामी लोकसभेतील निकाल यातून दाखवले आहे. देशभरातील भाजपविरोधातील नाराजी या निकालांमधून स्पष्ट होत आहे. देशाला राम मंदिराची नाही, तर राम राज्याची गरज आहे. आता, जनता भाजपला मतदान करेल असे वाटत नाही, असे राज यांनी म्हटले. तर, राहुल गांधींची पप्पू म्हणून खिल्ली उडवली जाते, त्यावर राज यांनी पप्पू आता परमपूज्य झाल्याचे म्हटले आहे. तसेच राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वनलाईन प्रतिक्रिया देताना, 'घमेंडी'च्या विरोधात लोकांनी मारलेली 'मुसंडी', असा मथळाच शेअर केला आहे. नेहमी व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदी सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्या राज यांनी यावेळी वन लाईन मथळ्यातून टीका केली आहे.  

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे भाजपच्या विजयी रथाला ब्रेक लागला असून गुजरात अन् कर्नाटक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्या भाजपा कार्यलयात आज शांती-शांती दिसून येत आहे. राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली. मात्र, भाजपला येथे सत्ता गमवावी लागली. तर मध्य प्रदेशमध्येही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे येथील सत्तेच्या सारीपाटावरुन पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्येही जोतिर्रादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे अच्छे दिन आल्याचे दिसून येते. तसेच, तेलंगणात भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. गतवर्षीच्या निवडणुकांमध्ये तेलंगणात भाजपाला 5 जागांवर विजय मिळाला होता. यंदा भाजपाचा एकच उमेदवार तेलंगणातून निवडणून आला आहे. तेलुगू लोकांनी भाजपला नाकारत प्रादेशिक पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला स्पष्टपणे स्विकारले आहे. त्यानंतर, सर्वच विरोधी राजकीय पक्षांकडून भाजपाविरोधी सूर आवळण्यात येत आहे. त्याचा पार्श्वभूमीवर राज ठाकरेनी वनालाईन टीका केली आहे. दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवरही सोमवारी राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. पटेल यांच्यावर दबाव आणून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याने सरकारची आता उलटी गिनती सुरू झाल्याचे राज यांनी म्हटले होते.  

टॅग्स :राज ठाकरेविधानसभा निवडणूक 2018 निकालमनसेराहुल गांधी